निलेश अडसुळ

अनेकदा नायकापेक्षा खलनायकच जास्त भाव खाऊन जातो. म्हणजे एक वेळ नायक किंवा नायिका लक्षात राहणार नाही, पण अमुक एका मालिकेत तमुक एक खलनायक होता, त्याचा तो ‘डायलॉग’, त्याची ‘शैली’ या गोष्टी आपल्याला चटकन सांगता येतात. कारण खलनायकाच्या खलबतांवरच नायक-नायिकांचा चांगुलपणा अवलंबून असतो. आता या अभिनेत्याने साकारलेले पात्र खलनायकाचे आहे असे म्हणता येणार नाही, पण नकारात्मक आहे हेही तितकंच खरं. त्यामुळे एखाद्या खलनायकाची जितकी चीड यावी तितकी चीड आता या सोहमची येते आहे. सोहम म्हटल्यावर कळणार नाही कदाचित ‘बबडय़ा’ म्हटलेलं चटकन लक्षात येईल. कारण हल्ली घराघरांत या बबडय़ाची चर्चा आहे. अनेक आई त्याला मारण्यासाठीही उत्सुक आहेत, तर काहींना त्याला शहाणपणाचे औषध पाजायचे आहे. त्याच सोहमशी म्हणजे आशुतोष पत्कीशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा.

‘आजवर मी अनेक कामं केली, पण ती कुणाच्या लक्षात राहिली नाहीत. आता कुठेही गेलो तरी लोक आवर्जून विचारपूस करतात, सोहम म्हणून मला भेटतात. हे केवळ ‘झी मराठी’चे श्रेय आहे,’’ याचा जाणीवपूर्वक उल्लेख आशुतोष करतो; पण त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासही गमतीशीर आहे. त्याविषयी तो सांगतो, ‘‘शाळेपासूनच मला अभिनयाची आवड होती. पण आई-वडिलांनी हे क्षेत्र जवळून पाहिलं असल्याने आईचा मात्र या क्षेत्राला विरोध होता. त्यामुळे माझी दुसरी आवड म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीकडे मी मोर्चा वळवला. बाबांच्या कामानिमित्ताने अनेक लोक घरी यायचे त्यावेळी ‘तुमचा मुलगा छान दिसतो, चांगला अभिनय करेल’ असा सल्ला ते हमखास देत. त्यातूनच आईचं मतपरिवर्तन होत गेलं आणि माझी वाट मोकळी झाली,’’ असे तो सांगतो.

‘अभिनय क्षेत्रात काम करायचं पक्क झाल्यावर ‘अनुपम खेर इन्स्टिटय़ूट’मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. पुढे कला क्षेत्राची ओळख व्हावी यासाठी निर्माते सुनील भोसले यांचा हात धरून मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला केदार शिंदे यांच्यासोबत सहाय्यक म्हणून ‘मधु इथे चंद्र तिथे’ आणि ‘दामोदर पंत’ हे दोन प्रोजेक्ट केले. या प्रक्रियेमध्ये मला अनेक कलाकारांचं काम बघता आलं. त्यांचा अभिनय, शैली जवळून पाहता आली. त्यामुळे माझाही अभ्यास पक्का होत गेला. यातूनच मला ‘मेंदीच्या पानावर’ ही मालिका मिळाली,’’ असे सांगत यशाचा प्रवास आशुतोषने उलगडला.

त्यानंतर मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून त्याचे प्रयत्न सुरूच होते. ‘दुर्वा’सारखी मालिका, ‘वन्स मोअर’ चित्रपट आणि नुकताच येऊन गेलेला ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांनी त्याच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं, परंतु मनासारखं यश प्राप्त झालं नाही, अशी खंतही तो व्यक्त करतो. तर ‘अगं बाई सासूबाई’ मालिकेतील त्याच्या पात्राविषयी तो सांगतो, ‘‘बाईचं जीवन तसं खडतरच. त्यातही ती कमावती नसली की नवऱ्यामागे तिच्या अनेक व्यथा ती मुक्याने सोसत असते. आशा-आकांक्षा मारून जगणाऱ्या या बाईने पुन्हा एकदा लग्नाचा विचार केला तर.. समाजाचं सोडाच, पण तिच्या घरच्यांनी तिला पाठिंबा दिला तरी पुरेसं आहे. याच अवस्थेतून सोहम जातो आहे. तो मूळचा वाईट नाही, पण आईच्या अशा निर्णयाने दुखावलेलं त्याचं मन त्याला या नाकारात्मक गोष्टी करायला भाग पाडतं आहे. त्यामुळे हे पात्र अधिक आव्हानात्मक आहे. कारण याला नकारात्मक बाजू आहे, पण तो खलनायक नाही. आईविषयीची तीव्र ओढ त्यामागे दडली आहे,’’ असं तो सांगतो.

याच भूमिकेमुळे आशुतोषला अनेक गमतीशीर अनुभव आले आहेत. तो सांगतो, ‘‘आता जेव्हा मी बाहेर पडतो तेव्हा लोक माझ्यावर प्रेम करतात हे पाहून खूप बरं वाटतं. पण कुठेतरी एखाद्या काकू येऊन मारतील की काय याचीही भीती वाटते. बाबांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा कुठे जातो तेव्हा कार्यक्रमाला आलेल्या काकू, आजी मला येऊन सांगतात, ‘अरे नको ना आईसोबत असा वागत जाऊस, किती त्रास देशील तिला..’ तर काही जण तर अगदी खोलात शिरत म्हणतात, ‘अरे अजूनही तुझा टॉवेल, कपडे आईच उचलून ठेवते, घडय़ा घालते. तिला जरा मदत करत जा’, हे जेव्हा ऐकतो तेव्हा लोकांची कमाल वाटते. विशेष म्हणजे आभासी पात्रांविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा खूप काही सांगून जातो. यातला महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, अनेक मुलं खऱ्या आयुष्यातही आईसोबत असेच वागत होते. ही मालिका पाहून त्यांनी स्वत:त परिवर्तन घडवलं आणि ते अनुभव त्यांनी समाजमाध्यमांमार्फत माझ्यापर्यंत पोहोचवले,’’ असेही तो म्हणतो.

वडिलांमुळे म्हणजेच संगीतकार अशोक पत्की यांच्यामुळे अशुतोषला संगीताचाही वारसा लाभला आहे; परंतु त्याने संगीतात न रमता वेगळी वाट निवडली. तो सांगतो, ‘‘लहानपणापासूनच घरात वाद्य, मैफिली, बैठका सुरू असायच्या त्यामुळे संगीत कानावर पडत होते. बाबांसोबत राहून मग तबला वाजवू लागलो. त्यांना साथसंगत करू लागलो. पण हे केवळ आवड म्हणून. मी संगीतक्षेत्रात यावं यासाठी बाबांनी माझ्यावर कधीही सक्ती केली नाही. मला हवं ते क्षेत्र निवडण्याची मुभा त्यांनी मला दिली. त्यामुळे माझ्या यशात यांचाही बहुमूल्य वाटा आहे.’’ बऱ्याचदा आई-बाबा कुणी प्रतिथयश असले की मुलांवर दडपण येतं. याच अनुभवाविषयी अशुतोष सांगतो, ‘‘दडपण येण्यापेक्षा कुतूहल अधिक होतं. बाबांना मिळणारी प्रसिद्धी, आदर हे आपल्यालाही कुठेतरी मिळवता यावं असं कायम वाटायचं. ‘शहीद भाई कोतवाल’मध्ये आणि ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेनिमित्ताने बाबांनी केलेली गाणी आणि माझी भूमिका असं सूत्र जुळून आलं तेव्हा मात्र हा आनंद काही वेगळाच होता,’’ असेही त्याने सांगितले.

तुलना करताना विचार करावा

‘‘बाबांना या क्षेत्रात येऊन पन्नास वर्षे झाली. त्यांचे अनुभव, कामाची परिपक्वता याची तुलना कुणाशीही होणार नाही. परंतु लोक मात्र या तुलनात्मक दृष्टिकोनातून माझ्याकडे पाहतात. हा अशोक पत्कींचा मुलगा आहे म्हणजे याने काहीतरी भन्नाटच करायला हवं अशा संकल्पना घेऊन लोक वावरत असतात. याचा मात्र प्रचंड त्रास होतो. मी या क्षेत्रात आता कुठे पाय रोवू पाहतोय. शिकण्याची-चुकण्याची ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. अशा वेळी समजून घेऊन पाठिंबा देणे गरजेचे असते. मार्गदर्शनाने, अनुभवाने मीही परिपक्व होत जाईन. आज बाबा ज्या ठिकाणी आहेत तिथपर्यंत पोहोचताना बाबाही कधीतरी चुकले असतील. तेही मोठय़ा कष्टाने इथवर पोहोचले आहेत, याची जाणीव मला असल्याने मीही ती उंची गाठण्याचा नक्की प्रयत्न करेन.’’

दिग्दर्शनाची आवड

अभिनयाची आवड असली तरी करिअरची सुरवात मात्र सहाय्यक दिग्दर्शनाने झाली. या प्रवासात कलाकृतीकडे दिग्दर्शकाच्या नजरेतून कसं पहायचं हे समजलं. केदार (शिंदे) दादाची यात खूप मदत झाली. एखादं काम आपण सातत्याने करत राहिलो की आपल्याला त्याची आवड निर्माण होत जाते. त्यातले बारकावे कळत जातात. तसंच काहीसं दिग्दर्शनाबाबत माझी अवस्था आहे. त्यामुळे दिग्दर्शनात काय वेगळं करता येईल याचाही विचार सुरू आहे. आपल्या नजरेतून जगाला एखादी गोष्ट सांगण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे दिग्दर्शनाची ओढ मनात कायम आहे.

भूतदया

माणसांप्रमाणेच प्राण्यांवर प्रेम करण्याचीही आज गरज आहे. अनेक प्राणी आपल्याला रस्त्यावर जखमी अवस्थेत दिसतात. त्यांच्यासाठी मदत म्हणून आपण सर्वांनी पुढे यायला हवं. मी स्वत: अनेक संस्थांशी जोडलो गेलो आहे. प्राण्यांचं औषधपाणी, त्यांचा वैद्यकीय खर्च याची जबाबदारी मी स्वत: घेतो. मला शक्य असेल ते प्राण्यांसाठी एखादं रुग्णालय किंवा त्यांचा सांभाळ होईल अशी एखादी जागा तयार करण्याचा मानस आहे.

लवकरच हॉटेल व्यवसायात

हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवीनंतर हॉटेल क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असतानाच अभिनय क्षेत्राकडे वळलो, पण अजूनही आपलं स्वत:चं हॉटेल असावं अशी इच्छा आहे. अर्थात ते सध्याच्या धावपळीत शक्य नाही. पण लवकरच मी स्वत:चे रेस्टॉरन्ट सुरू करेन. त्यासाठी लागणारे भांडवल, मेहनत ही माझी स्वत:ची असावी एवढी एक इच्छा आहे.