करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योगाला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. अनेक मोठे चित्रपट लांबणीवर गेले आहेत. तसेच अनेक कलाकार बेरोजगार देखील झाले आहेत. परिणामी या प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी सरकारने मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी दिली. मात्र त्यात एक अट घालण्यात आली आहे. ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी बाहेर पडता येणार नाही. सरकारच्या या निर्णयावर अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारचा हा निर्णय चूकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अवश्य पाहा – ‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

सरकारने ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी मनाई केली आहे. या निर्णयाविरोधात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आवाज उठवला आहे. “सरकारचा हा निर्णय निराधार आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन जॅकी श्रॉफ यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य पाहा – “हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल

यापूर्वी अभिनेते रजा मुराद यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती. “सरकारचा हा निर्णय निराधार आहे. कुठलाही विचार न करता त्यांनी हा अव्यावहारिक निर्णय घेतला आहे. अनेक चित्रपट मालिकांमध्ये जेष्ठ कलाकार आई, वडिल, आजोबांच्या भूमिका साकारतात. त्यांच्या कथानकाची ती गरज आहे. आता ऐनवेळी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे १०-१५ वर्षांचे कलाकार आजी- आजोबांच्या भूमिका करणार का? आणि तसं झालं तरी त्या जेष्ठ कलाकारांच्या रोजगाराचं काय? याचा विचार निर्णय घेताना सरकारने केला होता का?” असे प्रश्न रजा मुराद यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केले.