आपल्या लाडक्या मालिका आणि कलाकारांना गौरवण्याची संधी प्रेक्षकांना मिळवून देणारा ‘झी मराठी अवॉर्ड सोहळा – २०१४’ नुकताच पार पडला. यंदाच्या सोहळ्यामध्ये ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘जुळून येतील रेशीमगाठी’ या दोन मालिकांना प्रेक्षकांच्या पसंतीची मोहर उमटली आहे.
मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही ‘होणार सून..’ने ‘सवरेकृष्ट मालिकेचा’ पुरस्कार पटकावला असला तरी यंदा तिला तोडीस तोड म्हणून ‘जुळून येती..’नेही काटें की टक्कर दिलेली दिसून आली. ‘सवरेकृष्ट नायका’सोबत, सवरेकृष्ट कुटूंब, सवरेकृष्ट भावंड, सवरेकृष्ट आई, सवरेकृष्ट वडील, सवरेकृष्ट सासरे, सवरेकृष्ट सासू आणि सवरेकृष्ट विनोदी व्यक्तिरेखा या विभागातील पारितोषिके ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेच्या टीमने पटकावली आहेत. तर ‘होणार सून..’ने सवरेकृष्ट नायिका, सवरेकृष्ट जोडी, सवरेकृष्ट सून, सवरेकृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष, सवरेकृष्ट खलनायिका या विभागातील पारितोषिके पटकावली आहेत.  
सवरेकृष्ट सूत्रसंचालनाच्या पदावर यंदा निलेश साबळेने बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये ‘जय मल्हार’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका काहीशा मागे पडल्या असून त्यांना अनुक्रमे तीन आणि एक पारितोषिकावर समाधान मानावे लागले आहे. तर ‘जावई विकत घेणे आहे’ या मालिकेला मात्र पारितोषिकांमध्ये आपले खाते उघडता आले नाही. महाराष्ट्रातील चौदा शहरांमधील ७० केंद्रामधून सत्तर हजार प्रेक्षकांनी या निवडप्रक्रियेमध्ये भाग घेतला होता आणि त्यांच्या मतांवर हा निकाल आधारित करण्यात आला होता, अशी माहिती ‘झी मराठी’च्या सूत्रांनी दिली.