कादर खान आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री त्याकाळी बॉलिवूडमध्ये सर्वांनाच ठावूक होती. बच्चन यांच्या ‘सत्ते पे सत्ता’, ‘नसीब’ ‘मुक्कदर का सिंकदर’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी कादर खान यांनी संवादलेखन केलं. त्यामुळे बच्चन यांच्या यशात कादार खान यांचा वाटा हा खूपच मोलाचा होता. मात्र एका प्रसंगानंतर या दोघांच्या मैत्रीला ग्रहण लागले. कालांतरानं बच्चन यांच्याशी बोलणं कादर खान यांनी टाकलं. गेल्या दहाएक वर्षांपूर्वीच्या मुलाखतीत अनेकदा कादर खान यांनी मैत्रीत आलेल्या कटुपणाचे अनुभव सांगितले. मात्र असं असलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत ते अमिताभ बच्चन यांची खूप आठवण काढत होते, असं म्हणत कादर खान यांचा मुलगा सरफराज भावूक झाला.

२०१५ नंतर तब्येत बिघडल्यानं कादर खान चित्रपटसृष्टीतून दूर गेले. त्यानंतर ते मुलासोबत कॅनडातच राहू लागले. मात्र चित्रपटसृष्टीतून दूर गेल्यानंतरही त्यांना शेवटपर्यंत अमिताभ बच्चन यांची आठवण येतच राहिली. ते चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या खूपच जवळ होते. पण त्यांचा सर्वाधिक जीव हा अमिताभ बच्चन यांच्यावरच होता असं म्हणत सरफराजनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

कादर खान यांना गोविंदानं एकदाही फोन केला नाही- सरफराज खान

राजकारणामुळे अमिताभ बच्चन माणूस म्हणून पूर्णपणे बदलला अशी खंत काही वर्षांपूर्वी मुलाखतीत कादर खान यांनी बोलून दाखवली होती. ‘अमिताभनं मला राजकरणापासून दूर ठेवलं मात्र स्वत: त्याकाळी राजकारणात गेला. त्याचा हा निर्णय मला अजिबात पटला नव्हता. मी नाराज होतो. मी ज्या अमिताभला ओळखत होतो तो हा नव्हताच. आमच्यातल्या मैत्रीमुळे मी त्याला नेहमीच प्रेमानं अमित म्हणून हाक मारायचो, मात्र नंतर मी त्याला इतरांप्रमाणे अमितजी अशी आदरानं हाक मारावी अशी त्याची इच्छा होती. एक निर्माता मला म्हणाला होता अमिताभ आता खूप मोठा व्यक्ती झाला आहे त्याला अमित बोलणं योग्य नाही तू अमीतजी म्हणायला लाग मला त्याचं बोलणं आवडलं नाही. त्यानंतर आमच्या मैत्रीतील दरी वाढत गेली. मी कधीही त्याच्याजवळ गेलो नाही’ असं कादर खान म्हणाले होते.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्यानं ते कॅनडामधील एका रुग्णालयात भरती होते. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी बच्चन यांनी ट्विट करत प्रार्थना केली होती. ३१ डिसेंबर रोजी कादर खान यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं.