जवळपास ११ वर्षांपूर्वी अनुराग बासू दिग्दर्शित ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चार शहरांतील चार विविध कथा गुंफलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनीही चित्रपटाची प्रशंसा केली होती. आता त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी कलाकारांचीही निवड झाली आहे. ‘की अँड का’ चित्रपटातील जोडी करिना कपूर खान आणि अर्जुन कपूर ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये झळकणार आहेत.
‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार अनुरागने स्वत: या सिक्वलची पटकथा लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यामध्येही वेगवेगळ्या कथा असून त्यातील एकामध्ये करिना तर दुसऱ्या कथेत अर्जुन भूमिका साकारणार आहे. ‘लाइफ इन अ मेट्रो’मधील गाणीसुद्धा विशेष गाजली होती. त्यामुळे संगीत दिग्दर्शक प्रीतमची साथ सिक्वलसाठीही मिळणार असल्याचं कळतंय.
वाचा : महेश बाबूने वाढदिवशी दिली चाहत्यांना खास भेट
करिना आणि अर्जुनला सध्या बऱ्याच चित्रपटांचे ऑफर्स येत आहेत. करण जोहरच्या आगामी ‘तख्त’ या बिग बजेट चित्रपटातही करिना झळकणार आहे. तर अर्जुनच्या हातात चित्रपटांची यादीच आहे. राजकुमार गुप्ता यांचा ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’, आशुतोष गोवारिकर यांचा ‘पानिपत’, विपुल शाहचा ‘नमस्ते इंग्लंड’ आणि दिबाकर बॅनर्जीचा ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटांत अर्जुन भूमिका साकारणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 11:25 am