कोणाची कुठलीही पार्श्वभूमी असो, पण बॉलिवूडमुळे अनेकांची स्वप्न, महत्वकांक्षा पूर्ण झाल्या. पण आता बॉलिवूडबद्दल नकारात्मकता वाढत चालली आहे. हे दु:खद आहे असे मत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करीना कपूर खानने शनिवारी व्यक्त केले. जूनमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. ड्रग्ज, घराणेशाही या मुद्यांवरुन फिल्म इंडस्ट्रीवर टीका केली जातेय.

स्वत:साठी कुठलीही भूमिका न घेतल्याची इंडस्ट्री किंमत चुकवतेय का? असा प्रश्न पत्रकार बरखा दत्त यांनी विचारला. त्यावर करीनाने “बॉलिवूडबद्दल तिरस्कार इतक्या प्रमाणात वाढला आहे की, कलाकाराने काहीही केले तरी त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो” असे उत्तर दिले. “तुम्ही बोला किंवा बोलू नका, इंडस्ट्री सॉफ्ट टार्गेट आहे. तुम्ही एखाद्या विषयावर मत मांडलं  तरी, तुमच्यावर टीका होणार आणि शांत राहिलात तरी तुम्हाला बोलणार. कलाकारांना काही बोलायचे नसेल तर ते समजून घेण्यासारखे आहे. कारण विनाकारण कशा पद्धतीने ट्रोलिंग केले जातेय, ते तुम्ही पाहताय” असे करीना म्हणाली.

“आम्ही आमच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी इथे आहोत. द्वेष किंवा नकारात्मकता पसरवण्यासाठी नाही” असे करीनाने सांगितले. “बॉलिवूडच्या बदनामीचे जे प्रयत्न चालू आहेत, त्याची चिंता वाटते” असे करीनाने सांगितले.