काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खानने ते पुन्हा आई बाबा होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या बाळाचे नाव काय ठेवणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. आता खुद्द करीना कपूर खानने याबाबत एका शोमध्ये वक्तव्य केले आहे.

नुकताच करीनाने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान नेहाने करीनाला तू गर्भवती असल्याचे समजताच तुझ्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारापैकी कोणी तुला बाळासाठी नाव सुचवले आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर करीनाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘तुला खरं सांगू का? तैमूरच्या वेळी त्याच्या नावावरुन जे वाद झाले होता ते पाहून मी आणि सैफने अद्याप बाळाचे नाव ठरवलेले नाही. आम्ही नावाचा विचारनंतर करु आणि तुम्हा सर्वांना सरप्राइज देऊ’ असे करीना म्हणाली.

ऑगस्ट महिन्यात करीना आणि सैफने एक सोशल मीडिया पोस्टद्वारे ते दोघे पुन्हा आई-बाबा होत असल्याचे सांगितले होते. “आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असे सैफ व करीनाने म्हटले होते.

ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ-करीनाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. तैमुर तीन वर्षांचा असून सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात.