‘कौन बनेगा करोडपती १३’च्या शानदार शुक्रवार या खास भागात दर आठवड्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. स्पर्धाकांप्रमाणेच बिग बी अमिताभ बच्चन या सेलिब्रिटींसोबत धमाल करताना दिसत आहेत. येणाऱ्या शुक्रवारच्या या खास भागात बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोण आणि कोरिओग्राफर फराह खान हजेरी लावणार आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन आणि दीपिकाने ‘पीकू’ या सिनेमात एकत्र काम केलंय. ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या मंचावर बिग बींनी या सिनेमाच्या शूटिंगवेळीचे काही किस्से शेअर करत दीपिका बद्दल एक तक्रार केली आहे. दीपिका सेटवर आपलं जेवणं शेअर करत नसल्याचं ते म्हणाले आहेत. या शोच्या एका प्रोमोमध्ये बिग बी दीपिका आणि फराह खानची तक्रार करत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. दीपिका पदूकोण फूडी असल्याचं सांगत असतानाच बिग बी म्हणाले, ” साधारण एखादी व्यक्ती दिवसभरात तीनदा जेवते. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. पण मी अनुभव घेतला आहे की दीपिका दर तीन मिनिटाला खात असते.” बिग बींच्या या वक्तव्यावर दीपिकाने देखील याची कबुली दिली आहे.

हे देखील वाचा: ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री मृणाल ठाकूर

पुढे बिग बी म्हणाले, “दर तीन मिनिटाला तिला एका बाऊलमध्ये खायला मिळतं, मात्र तिने कधी मला विचारलं नाही की तुम्ही पण खाल का?” बिग बींच्या या म्हणण्यावर दीपिकाने मात्र विरोध केला. ती म्हणाली, “जेव्हा मी डब्बा उघडायचे अमिताभजी मला कायम विचारायचे मी काय खातेय आणि माझा पूर्ण डब्बा संपवायचे.” यावरून दीपिका आणि बिग बी यांच्या मजेशीर वाद रंगला. या शोमध्ये खोटं बोलण्याची परवानगी नसल्याचं बिग बी दीपिकाला म्हणाले.

यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी फराह खानची देखील फिरकी घेतली. फराह खानने देखील कधीही घरून आणलेली बिर्याणी शेअर केली नसल्याची तक्रार बिग बींनी केली. यावर फराह म्हणाली, “सर तुम्ही शाकाहारी आहात आणि शाकाहारींसाठी बिर्याणी नसते फक्त वेज पुलाव असतो.” यानंतर बिग बींनी कधीतरी वेज पुलाव तरी खायला मिळेल अशी अपेक्षा फराहकडे व्यक्ती केली. बिग बी, दीपिका आणि फराहमध्ये रंगलेली ही धमाल सेटवरील सर्वांनीच एन्जॉय केली.

दीपिका आणि बिग बी अमिताभ बच्चन लवकरच ‘द इंटर्न’ या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहेत. तसचं दीपिकाने तिचा दुसरा हॉलिवूड सिनेमा साइन केला आहे.