भांडवल, आशयनिर्मितीसाठी लागणाऱ्या तंत्रसाहाय्याचा अभाव; आघाडीच्या माध्यमांची चित्रपट हक्क घेण्याची तयारी नाही

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : भांडवल आणि आशयनिर्मितीसाठी लागणारे तंत्रसाहाय्य यांच्या अभावामुळे मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र ओटीटी माध्यम सुरू होण्यास आणखी वाट पाहावी लागणार आहे. ‘चित्रपट महामंडळा’बरोबरच ‘प्लॅनेट मराठी’, ‘लेट्सफ्लिक्स’ हे मराठी ओटीटी माध्यम येऊ पाहत आहेत.

६० ते ७० मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत असूनही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक येईल का, या भीतीने निर्मात्यांनी ‘वाट पाहू’ धोरण अवलंबले आहे. दुसरीकडे आघाडीची ओटीटी माध्यमे चित्रपटाचे हक्क घेण्यास तयार नाहीत. अशा वेळेस मराठीसाठी स्वतंत्र ओटीटी माध्यम निर्माण झाल्यास चित्रपटांची कोंडी फुटेल, अशी अपेक्षा आहे. ‘प्लॅनेट मराठी’, ‘चित्रपट महामंडळ’ आणि ‘लेट्सफ्लिक्स’ यांच्यातर्फे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली. मात्र अनेक कारणांमुळे ती रखडली आहेत.

तीन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय चित्रपट मराठी महामंडळातर्फे स्वतंत्र मराठी ओटीटीची घोषणा झाली. ही योजना अजूनही कागदावर आहे. तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे हे माध्यम प्रत्यक्षात येण्यास सहा महिने तरी लागतील. सध्या या माध्यमाचे स्वरूप, आशयनिर्मिती, अर्थकारण याबाबत प्राथमिक बोलणी सुरू असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. प्रथम महामंडळाकडील निधी यासाठी वापरण्यात येईल. नंतर काही निर्मात्यांचे सहकार्य घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर क्षोत्री आणि संगीतकार आदित्य ओक यांची संकल्पना असलेले ‘प्लॅनेट मराठी’ डिसेंबरमध्ये येईल, अशी अपेक्षा होती. यामध्ये दहा नव्या मराठी वेबसीरिज आणि लहान मुलांवरील आशयाचा समावेश असेल. मात्र, यालाही आशय आणि तांत्रिक साहाय्याची अडचण जाणवत आहे. पुढील तीन-चार महिन्यांत हे माध्यम सुरू होईल, असे बर्दापूरकर यांनी स्पष्ट केले. तरुणांना भावेल असे हे माध्यम असेल, असे त्यांनी सांगितले.

निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि राहुल नार्वेकर यांनी नुकतीच ‘लेट्सफ्लिक्स’ या ओटीटीची घोषणा केली. यात मराठीसह पाच भारतीय भाषांतील आशय उपलब्ध असेल. ‘सध्या केवळ घोषणा झाली असून पुढील वर्षी मार्चपर्यंत तो सुरू होईल. यासाठी आम्ही काही चित्रपट, वेबसीरिजचे हक्क विकत घेणार आहोत, तर काही आशयाची स्वतंत्रपणे निर्मिती करू,’ असे निर्माते फिरोदिया यांनी सांगितले.

काय आहे परिस्थिती ?

दाक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना पुरेसा प्रेक्षकवर्ग मिळत नसल्याने ‘अ‍ॅमेझॉन’, ‘नेटफ्लिक्स’, ‘डिस्ने हॉटस्टार’ हे आघाडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी चित्रपटांचे हक्क विकत घेण्यात रस दाखवत नाहीत किं वा निर्मिती मूल्यापेक्षा कमी पैसे देतात. सध्या केवळ विक्रोंत गोखले यांची प्रमुख भूमिका असलेला ‘एबीसीडी’ हा एकमेव मराठी चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे.