भारतरत्न लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि विख्यात संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांचे आत्मचरित्र गेल्या वर्षी प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद आता वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकाचे नाव ‘दीदी और मैं’ असे आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा साजरा केला जाणार आहे.
‘दीदी और मैं’ या पुस्तकात मीनाताईंनी साऱ्या देशाचं भूषण असलेल्या दीदींच्या उज्जवल कारकीर्दीचा समग्र आलेख आपल्या रसाळ शैलीत मांडला आहे. लता दीदींशी निगडित अनेक अविस्मरणीय आठवणी आणि मंगेशकर कुटुंबाची दुर्मीळ छायाचित्रे यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका मोठ्या आणि वैभवशाली कालखंडाचा समग्र दस्तऐवज, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
“दीदींच्या नव्वदाव्या वाढदिवसाचा शुभयोग साधून ‘दीदी और मैं’ प्रकाशित होत आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. हे पुस्तक म्हणजे, मी दीदीला दिलेली प्रेमाची मौल्यवान भेट आहे. हिंदी अनुवादामुळे आता हे पुस्तक देशपातळीवरील वाचक आणि दीदीच्या चाहत्यांपर्यंत पोहोचेल” असा विश्वास दीदीच्या भगिनी आणि संगीतकार मीना मंगेशकर- खडीकर यांनी व्यक्त केला.
एक प्रयोगशील संगीतकार म्हणून मीनाताई अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. ‘माणसाला पंख असतात’, ‘शाबाश सुनबाई’, ‘रथ जगन्नाथाचा’, ‘कानून का शिकार’ अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांना मीनाताईंचे संगीत आहे. त्यांनी स्वरबध्द केलेली ‘सांग सांग भोलानाथ’, ‘चॉकलेटचा बंगला’ ही बाल-गीतं मोठ्यांनाही आवडली. या गीतांची लोकप्रियता आजदेखील टिकून आहे.
दीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कैक जाहीर कार्यक्रमांत मीनाताईंचा सहभाग होता. तसेच, अनेक हिंदी सिनेमातही त्यांनी दीदींबरोबर पार्श्वगायन केले आहे. ‘मदर इण्डिया’ या गाजलेल्या चित्रपटातले ‘दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा’ हे संगीतकार नौशाद यांनी स्वरबध्द केलेलं गीत दीदींबरोबर मीनताईंनीही गायलं आहे.