अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी खास करून ओळखला जातो. मिलिंद सोमणच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरून मिलिंद त्याच्या फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कायमच प्रोत्साहन देत असतो.

नुकतीच मिलिंद सोमणने नियमित तपासणीचा भाग म्हणून सीटी स्कॅन चाचणी केली आहे. मिलिंदने एक फोटो शेअर करत नियमित तपासणीचं महत्व पटवून देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टवरून आता नेटकऱ्यांनी मिलिंद सोमणला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. या फोटोच्या कॅप्शनध्ये मिलिंद सोमणने बंगळूरुमध्ये त्याचं सीटी स्कॅन झाल्याचं सांगितलं. यावेळी ब्लॉकेजची तपासणी करण्यात आली असून सर्व काही ठीक असल्याचं तो म्हणाला. तसचं डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित सीटी स्कॅन करणं गरजेचं असल्याचा सल्ला मिलिंद सोमण दिलाय.

हे देखील वाचा: “राकेश बापट आवडतो पण तो थोडा…”; शमिता शेट्टीने व्यक्त केल्या भावना

पुढे मिलिंदने लिहिलं, “अन्न, व्यायाम, झोप, तणाव व्यवस्थापनासह आणि नियमित चांगल्या सवयी या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. मग तुमचं वय कितीही असो, प्रत्येक तपासणीच्या वेळी तुमच्या शरीराचं कार्य सुरळीत असल्याचं दिसून येईल.” मिलिंद सोमणने चाहत्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला असला तरी यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

हे देखील वाचा: कुणीतरी येणार येणार गं!, खुशबू तावडे आणि संग्राम साळवीने चाहत्यांना दिली गूड न्यूज

मिलिंद सोमणच्या या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “आवश्यकता नसल्यास सीटी स्कॅन करणं धोकादायक आहे. कृपा करून अशा गोष्टींचा सल्ला देऊ नका. सीटी स्कॅनमधून बाहेर पडणारे रेडिएशन अतिशय घातक असतात. त्यामुळे गरज नसल्यास सीटी स्कॅन करू नका” तर दुसरा युजर म्हणाला, ” वाईट सल्ला. सीटी स्कॅन कधीही प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचा भाग होऊ शकत नाही .यात तीव्र किरणोत्सर्गाचा समावेश असतो.” असं म्हणत युजरने मिलिंदच्या या सल्ल्याला नापसंती दर्शवली आहे.

milind-soman
(Photo-Instagram@milindrunning)

सीटी स्कॅनमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गाचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढू शकतो असं म्हणत अनेकांनी मिलिंद सोमणने दिलेल्या सल्ल्यावर संताप व्यक्त केलाय. ट्रोल होण्याची मिलिंद सोमणची तशी ही पहिली वेळ नव्हे. याआधी देखील अनेकदा मिलिंद सोमणला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.