अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. चित्रपटाला मिळालेलं यश साजरं करण्यासाठी सुशांत आपल्यात नाही याचं दु:ख होत असल्याचं ते म्हणाले.
आज तकला दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाब्रा यांनी सुशांतसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “सुशांत सारख्या गुणी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. दिल बेचारा या चित्रपटावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. एक दिग्दर्शक म्हणून मी खुष आहे. मात्र हा आनंद साजरा करण्यासाठी आपल्यासोबत सुशांत नाही याचं दु:ख देखील तितकच मोठं आहे. आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर सुशांतने हा चित्रपट अजरामर केला.”
अवश्य पाहा – मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर आलिया भट्टला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न
करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह बंद आहेत. परिणामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. मात्र तरीही चित्रपटाला आश्चर्यचकित करणारा प्रतिसाद मिळाला. ‘दिल बेचारा’ या चित्रपटाला २४ तासांत ९५ दशलक्ष व्हूज मिळाले. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीने देखील १० पैकी १० रेटिंग दिलं आहे.