‘मुल्क’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. अशात हा सिनेमा मुस्लिमांची सहानुभूती मिळवण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप दिग्दर्शक अनुभव सिन्हावर ठेवला गेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्दर्शक अनुभव सिन्हावर हा आरोप अनेकांनी केला. तसेच यावरून त्याला ट्विटरवरही ट्रोल करण्यात आले. एका मुस्लिम कुटुंबावर देशद्रोहाचा आरोप होतो आणि त्यानंतर ते कुटुंब स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कसा संघर्ष करते याची कहाणी या सिनेमात आहे असे ट्रेलरवरून दिसते आहे. मात्र अनेकांनी यावरून अनुभव सिन्हाला ट्रोल केले आहे. ज्यावर या सिनेमाच्या निर्मितीसाठी दाऊद, काँग्रेस किंवा संघाने पैसे दिलेले नाहीत असे उत्तर अनुभव सिन्हाने दिले आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्येच हा सिनेमा काही सत्य घटनांवर आधारित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अनुभव सिन्हाला विचारण्यात आले की मुस्लिम समाज दहशतवादाकडे का वळतो असे तु्म्हाला वाटते? त्यावर उत्तर देताना अनुभव सिन्हा म्हटला की काही दिवसांपूर्वीच देशाच्या दोन मंत्र्यांसाठी दंगल घडवून आणणाऱ्यांचे हिंदूंचे स्वागत करण्यात आले. एवढेच नाही तर देशातला कोणताही चांगला माणूस हा कट्टर नसतो असेही त्यांनी स्पष्ट केले. याच उत्तरावरून अनुभव सिन्हाला ट्रोल केले जाते आहे.

या ट्रोल्सनंतर अनुभव सिन्हाने सगळ्या ट्रोलर्सना आणि टिकाकारांना एक खुले पत्रच लिहिले आहे. या पत्रात त्याने आपल्याला सिनेमा बनवण्यासाठी दाऊद, काँग्रेस किंवा संघाने फंडिंग केले नसल्याचे म्हटले आहे. तसेच मुल्क हा सिनेमा एक चांगला सिनेमा आहे, तुम्ही जसा विचार करता तसा नाही. हा सिनेमा हिंदू-मुस्लिम या दोन धर्मांबाबत नाही, तर हा सिनेमा माझ्याबद्दल, तुमच्याबद्दल आपल्या सगळ्यांबद्दल आहे. मुल्क सिनेमात अभिनेते ऋषी कपूर, तापसी पन्नू, आशुतोष राणा, नीना गुप्ता, मनोज पहावा यांसारख्या कलाकारांनी अभिनय केला आहे. हा सिनेमा ३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.