अभिनेता हृतिक रोशन व त्याची बहीण सुनैना रोशन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. रोशन कुटुंबीयांमध्ये काही आलबेल नसून त्यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. सुनैनाच्या प्रेमसंबंधाला रोशन कुटुंबीयांकडून विरोध असून तिने याप्रकरणात अभिनेत्री कंगनाची मदत मागितली आहे. ‘मी ज्या मुस्लीम तरुणावर प्रेम करते तो दहशतवादी असल्याचं म्हणत वडिलांनी मला कानाखाली मारली,’ असं सुनैनाने सांगितलं. यावेळी तिने भाऊ हृतिक, वडिल राकेश रोशन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुनैना म्हणाली, ‘मी एका मुस्लीम तरुणावर प्रेम करते म्हणून वडिलांनी माझ्यावर हात उचलला. इतकंच नव्हे तर त्याला दहशतवादी म्हटलं. तो दहशतवादी असल्यास सोशल मीडियावर कसा सक्रीय असेल? गेल्या वर्षी फेसबुकच्या माध्यमातून आमची ओळख झाली. तो पत्रकार असून रुहैल आमिन असं त्याचं नाव आहे. वडिल व भाऊ मिळून माझं आयुष्य बरबाद करत आहेत आणि हे मी सहन करू शकत नाही. ते मला माझ्या प्रियकराला भेटू देत नाहीत. तो फक्त मुस्लीम आहे म्हणून ते त्याला स्वीकारत नाही आहेत. जर तो दहशतवादी असता तर पत्रकार म्हणून काम कसा करू शकला असता?’
आणखी वाचा : ‘रोशन कुटुंबीयांसाठी ही कठीण वेळ’; सुझान खानची पोस्ट
या संपूर्ण प्रकरणात हृतिकनेही मदत केली नसल्याचा आरोप सुनैनाने केला. मदतीसाठी कंगनाकडे धाव घेण्याविषयी ती पुढे म्हणाली, ‘घरातील प्रत्येक जण माझा छळ करत आहे. मी कंगनाशी संपर्क साधला होता आणि माझा तिला पूर्ण पाठिंबा आहे. हृतिक व तिच्यात नेमकं काय घडलं माहीत नाही पण आग लागल्याशिवाय धूर दिसत नाही. कंगना माझी चांगली मैत्रिण होती. राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यावर मी तिला मेसेज केला होता. पण यापुढे तू माझ्याशी संपर्क साधू नकोस असं ती म्हणाली. हृतिक व तिच्यात काय घडलं हे मला कोणीच सांगितलं नाही. जर माझ्या भावाकडे तिच्याविरोधात पुरावे असतील तर त्याने ते समोर आणावेत. तो हे पुरावे का लपवत आहे?,’ असा प्रश्न तिने हृतिकवर उपस्थित केला.
First Published on June 20, 2019 3:44 pm