आयुष्य म्हणजे बऱ्यावाईट अनुभवांचं एक गाठोडंच असतं. त्यात अनेकांच्या वाट्याला येणारं सुखदु:खाचं प्रमाणही कमी जास्त असंच असतं. काहींच्या वाट्याला दु:ख जास्त, तर काहींच्या वाट्याला सुख जास्त असतं. अभिनेता संजय दत्तच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. एक अभिनेता, सेलिब्रिटी म्हणून संजूबाबाची वेगळी ओळख आहे. पण, एक व्यक्ती म्हणून त्याच्या आयुष्याच्या प्रवासात बरेच अडथळे आले असून कठिण प्रसंगांचा त्यानेही सामना केल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. संजयच्या आयुष्यातील असेच काही प्रसंग ‘संजू’ या चित्रपटात रेखाटण्यात आले.

यातीलच एक भावनिक प्रसंग म्हणजे आजारपणातही नर्गिस यांनी संजय दत्तला आधार देण्याचा केलेला प्रयत्न. ३ मे १९८३ ला कर्करोगामुळे नर्गिस यांचं निधन झालं होतं. त्यावेळी संजय अजिबातच रडला नव्हता. ‘रॉकी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्यावर हा आघात झाला होता. जवळपास तीन वर्षे संजयने त्याच्या भावना अडवून धरल्या होत्या. पण, तीन वर्षांनंतर ज्यावेळी रेकॉर्ड केलेल्या टेपच्या माध्यमातून संजयने त्याच्या आईचा आवाज ऐकला तेव्हा मात्र त्याच्या भावना अनावर झाल्या आणि तो ढसाढसा रडला. आता नर्गिस यांची ती ऑडिओ क्लिप पहिल्यांदाच समोर आली आहे.

 

संजू तुझ्यातील माणूसकी जप. चरित्र जप. कधीही कोणत्याच गोष्टीत गर्विष्ठपणा दाखवू नकोस. समंजसपणे वाग, मोठ्यांचा आदर कर. कारण याच गोष्टी तुला पुढे नेणार असून काम करण्यासाठी याच गोष्टी तुला प्रोत्साहन देत राहतील’, असं नर्गिस त्या रेकॉर्डमध्ये म्हणाल्या होत्या.