आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता एका अनोख्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच रोमँटिक भूमिका साकारली आहे. त्यापूर्वी तो ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनमध्ये तो झळकला होता. या सिझनची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. पण प्रदर्शित झाल्यानंतर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी त्यावर टीकासुद्धा केली. या टीकांबद्दल तुझं काय मत आहे असा प्रश्न विचारल्यावर नवाजुद्दीन भडकला. ‘पिंकविला’ या वेबसाइटला त्याने मुलाखत दिली.

या मुलाखतीत तो म्हणाला, ”दुसरा सिझन काही ठिकाणी थोडासा कंटाळवाणा झाला. मला जी भूमिका दिली होती ती मी माझ्या परीने साकारली. ज्यांना चित्रपटांबाबत माहित आहे त्यांच्या टीकेचा मी स्वीकार करतो. आजकाल तर कोणीही येऊन तुमच्यावर टीका करून जातो. माझ्या दर्जाचे जे लोक आहेत, ज्यांना माझ्या इतकं चित्रपटांबद्दल, अभिनयाबद्दल माहित आहे, त्यांनी माझ्यावर टीका करणं मला मान्य आहे. कोणताही ‘ऐरा गैरा नत्थू खेरा’ येऊन जर माझ्या अभिनयावर टिप्पणी करत असेल तर मला ते मान्य नाही.” यावेळी त्याने गणेश गायतोंडेच्या भूमिकेला कंटाळल्याचीही भावना व्यक्त केली.

सध्याच्या चित्रपटांच्या ट्रेण्डबाबत बोलताना त्याने नव्याने येणाऱ्या कॉमेडी चित्रपटांवरही टीका केली. ”आजकाल कौटुंबिक चित्रपटांमध्येही अश्लिल संवाद असतात. समाज अशा चित्रपटांना स्वीकारतोय. पण जर गणेश गायतोंडेच्या भूमिकेत मी शिव्या दिल्या तर त्यावर आक्षेप घेतला जातो. आजकालच्या कॉमेडी चित्रपटांमध्येही सर्रास शिव्या वापरल्या जातात. लोकांचं फक्त मनोरंजन करण्यासाठी तुम्हीही काहीही कराल का?” असा सवाल त्याने केला.