प्रेमात आकंठ बुडण्यासाठी ‘बेधुंद’ हे मराठी रोमँटिक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. रोहितराज तुकाराम कांबळे प्रथमच दिग्दर्शन करत असून, प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आणि गायक हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणं उत्कृष्टरित्या गायले आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग ठाण्याच्या सीएनएम म्युझिक फॅक्टरी या स्टुडिओमध्ये पार पडले.

भक्ती गीतांसह हिंदी आणि मराठीत ‘तू जिथे मी तिथे’, मन हे बावरे, सख्या रे साजणा अशी एकाहून अनेक भन्नाट गाणी गाणारी प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल व ‘धागा धागा’, ‘सिंपल’, ‘रोज मला विसरून मी’, ‘गरा गरा’ अशी प्रेमाची गाणी गाणारा गायक हर्षवर्धन वावरे या दोघांनी प्रथमच एकत्र रोमँटिक गाणं गायलं आहे. ‘बेधुंद मी बेधुंद तू’ असे या गाण्याचे बोल आहेत.

या अल्बम संदर्भात बोलताना गायिका नेहा राजपाल हिने सांगितले की, गायक हर्षवर्धन वावरे सोबत प्रथमच हा अल्बम करतेय. बेधुंद हे प्रेमावर आधारित गाणं आहे. प्रेमाच्या अशा फेब्रुवारी महिन्यात रेकॉर्ड होत असल्याने गाणं गाताना एक वेगळीच मजा आली आहे. त्यामुळे हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल.

गायक हर्षवर्धन वावरे या संदर्भात म्हणाला की, गायिका नेहा राजपाल सोबत हा अल्बम गाण्याची संधी मिळतेय याचा मला खूप आनंद होतोय. व्हॅलेंटाईन वीक नुकताच सर्वांनी साजरा केला. या निमित्तानेच प्रेमावर आधारित अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण करण्यात आले. साईक्षा फिल्म अँड क्रिएशन प्रस्तुत हे गाणे आहे. हे गाणं तरुण पिढीला नक्कीच आवडेल असा विश्वास दिग्दर्शक रोहितराज तुकाराम कांबळे यांनी व्यक्त केला.