News Flash

‘लय भारी’ आव्हानात्मक – निशिकांत कामत

'डोंबिवली फास्ट' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक निशिकांत कामत याच्याशी केलेल्या 'लय भारी' गप्पागोष्टी....

| July 12, 2014 01:00 am

‘डोंबिवली फास्ट’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक निशिकांत कामत याच्याशी केलेल्या ‘लय भारी’ गप्पागोष्टी….

हिंदीत ‘फोर्स’ हा चित्रपट केल्यानंतर तू ‘लय भारी’च्या निमित्ताने चित्रपटसृष्टीत पुनरागम करतोयस. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चित्रपटसृष्टीत परतत असताना, तुला ‘लय भारी’ चित्रपट निवडावासा का वाटला?
खरं तर एकत्र चित्रपट करायचा असं बराच काळापासून रितेश देशमुख आणि माझ्या मनात होते. एके दिवशी साजिद नाडियादलवालाने लिहलेली कथा आमच्या हाती लागली. साजिदला या कथेवर हिंदीत चित्रपट करायचा होता. मात्र, ही कथा ऐकल्याक्षणी मला ती इतकी आवडली की, मी या कथेवर मराठीत चित्रपट करण्याबद्दल साजिदला विचारले. माझ्या प्रस्तावास साजिदचा होकार मिळाल्यानंतर ‘लय भारी’चे निर्माते जितेंद्र ठाकरे आणि अमेय खोपकर यांच्याशी चर्चा करून आम्ही या कथेवर चित्रपट करायचा अंतिम निर्णय घेतला. मुख्य म्हणजे या चित्रपटातून रितेश देशमुख मराठीत पदार्पण करत असल्याने, हा चित्रपट चांगल्या ताकदीचा बनणे गरजेचे होते. मात्र, चित्रपटाच्या पटकथेची जबाबदारी रितेश झा यांनी आपल्या खांद्यावर घेतली. तर दुसरीकडे संजय पवार यांनी लिहलेल्या संवादांमुळे माझे काम खूपच सोपे झाले. संगीतकार अजय-अतुल यांच्यामुळे चित्रपट प्रभावी होण्यास मोठी मदत झाली.

रितेश देशमुखने हिंदी चित्रपटांत एक यशस्वी कलाकार म्हणून नाव कमावले आहे. ‘लय भारी’च्या निमित्ताने रितेशने निर्मात्याच्या भूमिकेतसुद्धा पदार्पण केले. तेव्हा एक कलाकार आणि निर्माता दोन्ही पातळ्यांवर रितेश देशमुखविषयी तुला कशाप्रकारचा अनुभव आला?
रितेशला आजवर मराठी चित्रपटांमध्ये काम करायचा कोणताही अनुभव नसल्याने, चित्रिकरणाच्या पहिल्या काही दिवसांत रितेश थोडासा नर्व्हस होता. मात्र, एकदा सरावल्यानंतर रितेशने मागे वळून पाहिले नाही. रितेशची मातृभाषाच मराठी असल्याने आणि हिंदी चित्रपटांचा अनुभव गाठीशी असल्याने रितेशने सर्व काही सहज निभावून नेले. निर्माता म्हणून रितेशविषयी विचाराल तर, त्याने सुरूवातीलाच निर्मितीची सगळी सूत्रं जेनेलियाकडे सोपविली होती. मात्र, यापूर्वी ‘फोर्स’ चित्रपटासाठी मी आणि जेनेलियाने एकत्र काम केले असल्याने ‘लय भारी’च्या वेळी एकत्र निर्णय घेताना आम्हाला कोणतीच अडचण आली नाही. तसेच या चित्रपटासाठी झी मराठीने केलेल्या सहकार्यासाठी मी खरचं त्यांचा आभारी आहे.

चित्रपटातील सलमान खानच्या सहभागाविषयी काय सांगशील?
सलमान खानने या चित्रपटात पाहुण्या कलाकारची भूमिका केली आहे. एकदा हैदराबादमध्ये चित्रिकरण सुरू असताना, रितेश आणि सलमान यांची भेट झाली. त्यावेळी ‘ अरे यार मलापण चित्रपटाच्या एखाद्या सीनमध्ये काम करायचे आहे’, असे सलमानने सांगितल्यावर ‘लय़ भारी’च्या संपूर्ण टीमला आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का बसला होता. मग त्यानुसार, चित्रपटासाठी रितेश आणि सलमानचा एक मजेशीर सीन चित्रित करण्यात आला. विशेष म्हणजे या सीनमध्ये  सलमान खान मराठी भाषेतील संवाद सहजपणे म्हटले आहेत.

‘लय भारी’ हा व्यवसायिक चित्रपट असल्याचे जाणवते…
आम्ही सुरूवातीपासूनच व्यवसायिक गणिते डोळ्यांसमोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले होते. ‘फोर्स’नंतर मीसुद्धा एखादा व्यवसायिक दर्जाचा चित्रपट करण्याच्या विचारात होतो. मात्र, ‘लय भारी’चा अनुभव संपूर्णपणे वेगळा होता. एक चित्रपट म्हणून ‘लय भारी’मध्ये गाणी, नृत्य, रोमान्स आणि दर्जेदार कथा यापैकी कशाचीही कमतरता नव्हती. पंढरपूर येथे चित्रीत झालेले विठ्ठलाचे गाणे अजय-अतुल यांनी अत्यंत सुरेख रितीने संगीतबद्ध केले. त्याचप्रमाणे चित्रपटातील ‘होळी’ गीतालादेखील त्यांनी उत्तम संगीत दिले आहे. अगदी सुरूवातीपासूनच संगीताच्या सुरेख वापरामुळे चित्रपट आणखी प्रभावी होण्यास मदत झाली.

‘लय भारी’ लोकांना कितपत आवडेल असे तुला वाटते?
एक दिग्दर्शक म्हणून पहिल्या वेळी माझा चित्रपट प्रदर्शित होताना जितकी भिती आणि उत्कंठा माझ्या मनात होती , तितकीच आतासुद्धा वाटत आहे. ‘लय भारी’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडावा आणि व्यवसायिकदृष्ट्यासुद्धा यशस्वी ठरावा एवढीच आशा सध्यातरी मी करत आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना भूतकाळात मिळवलेल्या यशावर तुम्हाला अवलंबून राहता येत नाही, आणि मीसुद्धा चित्रपट करताना प्रत्येकवेळी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. ‘लय भारी’च्या निमित्ताने मी एक वेगळा प्रयत्न करून पाहिला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या यशाबद्दल काळजी वाटणे अगदी साहजिकच आहे. मुख्य म्हणजे ‘लय भारी’मधून रितेश मराठीत पदापर्ण करत असल्याने, हा चित्रपट प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

भूतकाळातील यशाबद्दल बोलायचेच झाले तर, तू यापूर्वी ‘डोंबिवली फास्ट’सारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट दिग्दर्शित केला आहेस. आता या चित्रपटाचा नायक संदीप कुलकर्णी ‘डोंबिवली रिटर्न्स’मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. तेव्हा याबद्दल तू काय सांगशील?
हो, संदीपने मला फोन करून याविषयी सांगितले होते. मात्र, चित्रपटाबद्दल मला विशेष माहिती नाही. चित्रपट बघितल्यानंतरच त्याविषयी मी बोलणे अधिक योग्य ठरेल.

मग, आता ‘लय भारी’ नंतर पुढे काय?
मी आजपर्यंत काम करताना नेहमीच माझ्या मनाचा कौल ऐकला आहे. मी भविष्याविषयी कधी जास्त विचार करत नाही.(हसून)

‘स्क्रीन’ मासिकातून साभार…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2014 1:00 am

Web Title: on a new turf
Next Stories
1 ‘माझ्यावरील विनोदांमुळेच मला चांगल्या भूमिका मिळाल्या’
2 अबब! ३५ किलोचा गाऊन
3 रितेश नव्हे ‘माऊली’!
Just Now!
X