बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता एक महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी केली आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परिणामी या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

अवश्य पाहा – “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण: करणवर आरोप करताना कंगनाने आदित्य ठाकरेंचाही केला उल्लेख

पार्थ पवार यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती केली. “सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” अशा आशयाचं ट्विट करुन पार्थ यांनी या भेटीबाबत माहिती दिली. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील सुशांत मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी केली होती. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. मोदींनी देखील या पत्राची नोंद घेतली होती. परिणामी सुशांतच्या केसला आणखी गती प्राप्त होईल व खरे गुन्हेगार लवकरच पकडले जातील असं म्हटलं जात आहे.