‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं’, हा प्रश्न एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली द बिगनिंग’ या चित्रपटातून उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संपूर्ण देश आणि जगभरातील प्रेक्षकांनी हिरीरीने पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. खुद्द राजामौलींनी या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना एका भव्य दिव्य चित्रपटातून म्हणजेच यांनी ‘बाहुबली द कन्क्लुजन’च्या माध्यमातून दिलं आणि कलाविश्वात दिग्दर्शनाची ताकद दाखवून दिली. एखाद्या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळाल्यावर तो कशी उत्तुंग शिखरं गाठतो हे राजमौली यांच्या बाहुबली प्रोजेक्टने दाखवून दिलं.
‘बाहुबली’च्या निमित्ताने चित्रपटातून झळकलेला अभिनेता प्रभासही असा काही लोकप्रिय झाला की त्याने शाहरुख, सलमानला मागे टाकत आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. आज ‘बाहुबली २’ला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने प्रभासने एका पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
‘आज ‘बाहुबली २’ प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. हा चित्रपट माझा हृदयाच्या खूप जवळचा आहे. मला आणि चित्रपटाला प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. या सुंदर आणि भावनिक प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद. त्यासोबतच राजामौली आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमलाही शुभेच्छा. मी त्या सर्वांचा कायम ऋणी राहीन,’ असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वाचा : भन्साळींसोबत काम करण्यास पुन्हा एकदा ‘मस्तानी’ सज्ज?
‘बाहुबली २’ प्रदर्शित होऊन एक वर्ष झालं असलं तरीही आतासुद्धा या चित्रपटाच्या कमाईचे आकडे उंचावत आहेत. काही दिवसांपूर्वी जपानमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट तेथील प्रेक्षकांचीही मनं जिंकत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2018 6:26 pm