जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १६ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. शुक्रवारी पहाटे बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसाठी अभिनेता प्रकाश राज यांनी आपल्या प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

“ही हृदयद्रावक घटना आहे. आपण त्यांना सोडलं. या दुर्दैवी घटनेला आपण सर्वजण जबाबदार आहोत. आता तरी आपण आपल्या कमकुवत प्रशासनाकडे बघणार का?” अशा आशयाचे ट्विट प्रकाश राज यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

नेमकी घटना काय घडली होती?

जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले होते. जखमीपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येथे नेहण्यात आले आहे. रेल्वे रूग्णालयात जखमींवर उपाचार सुरू आहेत. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.