गरोदर आहे, या गोड बातमीमध्ये तरंगण्याचे दिवस म्हणजे नवशिक्या आईबाबांसाठी अतीव सुखद अनुभव. स्त्रीच्या आयुष्यातील ही एक खूप महत्त्वाची गोष्ट. आई आणि बाळ अशा दोन जिवांची भावनिक आणि आरोग्याची नाळ एकमेकांशी जोडण्याचे हे दिवस. अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या गरोदरपणातील याच दिवसांचा मनमुराद आनंद लुटत आहे. अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक जुना फोटो पोस्ट केला असून त्यावरील कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनाही हसू आवरलं नाही.

एका खुर्चीवर दोन्ही पाय पोटाजवळ घेऊन आनंदाने खात असतानाचा अनुष्काचा हा जुना फोटो आहे. ‘जेव्हा मी अशाप्रकारे बसूही शकत होती आणि खाऊ शकत होती. पण आता मी असं बसू शकत नाही पण खाऊ नक्की शकते’, असं मजेशीर कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोला दोन दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे.

आणखी वाचा- ‘विरुष्का’च्या या फोटोने ट्विटरवर घातला धुमाकूळ, मोडले सर्व विक्रम

जानेवारी २०२१ मध्ये अनुष्का-विराटच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. गरोदरपणात अनुष्का आहारासोबतच योगसाधनेलाही फार महत्त्व देत आहे. काही दिवसंपूर्वीच तिचा शीर्षासन करतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.