News Flash

भन्साळींच्या ‘पद्मावत’ला मनसेचे सुरक्षा कवच

भारत बंदची हाक देणं चुकीचच आहे

राज ठाकरे, पद्मावत

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाला देशभरातील अनेक राज्यांमध्ये करणी सेनेचा विरोध असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली आहे. ‘पद्मावत’ला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला असतानाही करणी सेनेने त्याला विरोध करणं चुकीचं आहे, या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देणं तर निश्चितच चुकीचं आहे, असं सांगत मनसेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यासोबतच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्यासाठी आवश्यकता भासल्यास मनसे सज्ज असेल, असंही त्यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने ‘पद्मावत’ सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गुजरातमध्ये हा सिनेमा प्रदर्शित न होण्याची चिन्हं आहेत. करणी सेनेने दिलेल्या धमक्या पाहता त्यामुळे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी गुजरातमधील मल्टीप्लेक्स मालकांनी भन्साळींचा हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचविषयी आपलं मत मांडत ‘देशाचे पंतप्रधान ज्या राज्याचे आहेत, त्याच राज्यातच जर कायदा व सुव्यवस्था राखली जाणार नसेल, त्या राज्यात जर सिनेमा प्रदर्शित होणार नसेल तर इतर राज्यांमध्ये कायदा- सुव्यवस्थेची किती वाईट स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही’, अशी टीकाही त्यांनी केली.

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धावही घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मात्र चित्रपटाच्या बाजून निर्णय दिल्यामुळे भन्साळींना दिलासा मिळाला. याविषयी मनसेची भूमिका स्पष्ट करत शालिनी ठाकरे म्हणाल्या, ‘महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनेही काही सिनेमांना विरोध केला होता, मात्र आजवर कधीही कोणत्याही चित्रपटाच्या आशयावर आम्ही आक्षेप घेतलेला नाही. एखाद्या सिनेमात मुंबई ऐवजी बॉम्बे शब्द वापरला गेला असेल किंवा आपल्या शत्रुराष्ट्राच्या पाकिस्तानी कलावंतांनी भूमिका केली असेल, तरच आम्ही आक्षेप घेतला आहे. संजय लीला भन्साळी यांच्याच ‘बाजीराव’ या सिनेमाबाबत पुण्यातील अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता, पण मनसेने ‘बाजीराव’ सिनेमाला कधीही विरोध केला नाही. ऐतिहासिक सिनेमांना विरोध करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, असे सिनेमे म्हणजे काही ऐतिहासिक माहितीपट नसतात. सिनेमा बनवताना लेखक-दिग्दर्शक काही प्रमाणात का होईना सिनेमॅटिक लिबर्टी घेणारच.’

मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्यापासून रोखण्याचा कोणी प्रयत्न केला, तर मनसे या सिनेमाच्या दिग्दर्शक- कलावंतांच्या संरक्षणासाठी सक्षम आहे, त्यांनी स्पष्ट करत भन्साळींच्या ‘पद्मावत’ला मनसेचं सुरक्षा कवच असल्याचं स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 9:01 pm

Web Title: raj thackerays maharashtra navnirman sena to support release of bollywood movie padmaavat
Next Stories
1 Padmaavat screening : वाद निर्माण झालेल्या ‘पद्मावत’मध्ये आक्षेपार्ह काही नाही
2 ‘भन्साळी सर्वांची फसवणूक करतायेत’, चित्तोडच्या राणीही ‘पद्मावत’च्या विरोधात
3 ‘पुरुष कलाकारांना जास्त मानधन मिळते कारण….’
Just Now!
X