‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधला भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. राणाने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.

राणाने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. तसंच त्याने ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखदेखील याच वेळी जाहीर केली आहे. “२०२१च्या पहिल्या त्रैभाषिक चित्रपटासाठी तयार आहात का? Man VS Nature असा रोमांचक लढा घेऊन हत्तीला वाचवण्याच्या हेतूने आलो आहोत, ३ मार्च रोजी आरण्य आणि कदानचा ट्रेलर तर ४ मार्च रोजी हाथी मेरे साथीचा ट्रेलर इरॉस नाववर पाहायला मिळेल. २६ मार्च रोजी चित्रपटगृहात,” अशा आशयाचे ट्विट राणाने केले आहे. सोबतच #SaveTheElephants असे हॅशटॅग राणाने त्या ट्विटमध्ये वापरले आहे.

‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये त्याचे नाव ‘हाथी मेरे साथी’ असे आहे. तर तामिळ, तेलुगू, कन्नड या भाषांमध्ये ‘आरण्य आणि कदान’ असे नाव असणार आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

हाथी मेरे साथी या चित्रपटाची पटकथा ही एका माणसाच्या आयुष्यावर आहे. ज्याने आयुष्यातील बराच काळ जंगलात घालवला आणि त्याचे आयुष्य पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समर्पित केले आहे. माणूस आणि हत्ती यांच्यातील मैत्रीची ही गोष्ट आहे.

‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात राणा सोबत अभिनेता पुलकित सम्राट, विष्णु विशाल, अभिनेत्री श्रिया पिळगावकर, झोया हुसेन आहेत. तर तमिळ चित्रपट दिग्दर्शक प्रभू सोलोमन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती इरॉस मोशन पिक्चर्सने केली आहे.