चौकटी बाहेरील भूमिका साकारुन अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रणदीप हुडा. रणदीप लवकरच सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. चित्रपटातील एका अॅक्शन सीनदरम्यान रणदीप जखमी झाल्याचे समोर आले आहे.
दोन दिवसांपूर्वी एका अॅक्शन सीनदरम्यान रणदीपला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रणदीपच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचे समोर आले आहे. त्याचा रुग्णालयातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
‘राधे’ चित्रपटात तीन ते चार अॅक्शन सीन दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटातील साहसदृश्यांसाठी सलमान खानने विशेष कोरियन स्टंट टीम नेमली आहे. या सीनमध्ये स्मोक फाइट, गन शूट- आऊट, मारामारी आणि सलमानची शर्टलेस फाइट दाखवण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त रणदीप इम्तियाज अली यांच्या ‘लव आज काल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांची केमिस्ट्री पाहायला मिळाणार आहे.