जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाले आहे. सोशल मीडियावर हे दोघं नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसतात. नुकतीच ही जोडी एका मुलाखतीत उपस्थित होती. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या मुलाखतीला रणवीर-दीपिकासोबतच आलिया भट्ट, आयुषमान खुराना, मनोज बाजपेयी या बॉलिवूड कलाकारांसोबतच विजय देवरकोंडा, पार्वती आणि विजय सेतूपती हे दाक्षिणात्य कलाकारसुद्धा हजर होते. या मुलाखतीदरम्यान आलिया भट्ट ही सूत्रसंचालक अनुपमाच्या प्रश्नाचं उत्तर देत असतानाच रणवीरने हळूच दीपिकाच्या खांद्यावर किस केलं. हे पाहताच अनुपमा म्हणाला, “मैंने कहा था, नो पीडीए” (पीडीए म्हणजे पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन/ सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन करणे). यावर दीपिकाही हसू लागली. त्यावर आयुषमान खुरानाने मस्करीत म्हटलं, “हे तर खूप कठीण आहे.” हे ऐकताच सर्वांनाच हसू कोसळलं.
रणवीर-दीपिका लवकरच ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहेत. ’83’ या चित्रपटात दीपिका रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. १९८३ साली भारताने क्रिकेटमध्ये जिंकलेल्या विश्वचषकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 12:09 pm