अभिनेत्री रवीना टंडनने वयाच्या २१ व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेण्याचा मोठा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाचं कौतुक तर झालंच पण त्याचसोबत तिला टीकांनाही सामोरं जावं लागलं होतं. बॉलिवूडमधील करिअर जोरदार सुरू असताना असा निर्णय तिच्या करिअरला ब्रेक लावू शकतो, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मुलींना दत्तक घेण्याच्या या निर्णयाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना व्यक्त झाली.

पूजा आणि छाया या दोन मुलींना रवीनाने दत्तक घेतलं होतं. या दोघींची लग्न झाली असून त्यांना लहान मुलंसुद्धा आहेत. दत्तक घेण्याचा निर्णय हा आयुष्यातला सर्वोत्कृष्ट निर्णय असल्याचं रवीना म्हणाली. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “त्या दोघींविषयी माझ्या मनात अशी काही भावना निर्माण झाली होती की वयाच्या २१व्या वर्षी मला तो निर्णय घेण्यात काहीच गैर वाटलं नव्हतं. माझ्या आयुष्यातला तो सर्वोत्कृष्ट निर्णय होता. त्यांना माझ्या मिठीत घेण्यापासून ते त्यांची लग्न होईपर्यंत त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे.”

दत्तक घेण्याच्या निर्णयाचा परिणाम रवीनाच्या लग्नावरसुद्धा होईल, असंही अनेकांनी तिला त्यावेळी सांगितलं होतं. याविषयी तिने पुढे सांगितलं, “त्यावेळी लोकांना माझा निर्णय फार काही आवडला नव्हता. माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही असंदेखील काहीजण म्हणाले. पण म्हणतात ना, नशिबात जे लिहिलेलं असतं, ते कसंही पूर्ण होतं.”

आणखी वाचा- ‘टायगर जिंदा है’चा दिग्दर्शक अली अब्बास जफरने बांधली लग्नगाठ

रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केलं. या दोघांना राशा ही मुलगी आणि रणबिरवर्धन हा मुलगा आहे. रवीनाने दत्तक घेतलेल्या मुलींपैकी छाया एअर हॉस्टेस आहे तर पूजा इव्हेंट मॅनेजर आहे.