अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन व्यवहार करणं सुकर झालं आहे. मात्र बऱ्याचवेळा या ऑनलाइन व्यवहारामुळे त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. दररोज सायबर क्राइमची एक तरी तक्रार कानावर पडतेच. याच सायबर क्राइमचा फटका एका अभिनेत्रीला बसला आहे. तिच्या खात्यातून २७ हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नागिन 3’ मधील अभिनेत्री मृणाल देशराजला बँक फ्राँडचा फटका बसला असून तिच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली आहे. ‘स्पॉटबॉय’शी बोलताना तिने ही माहिती दिली.

२५ फेब्रुवारी रोजी माझी फसवणूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. ही माझ्या कष्टाची कमाई होती. परंतु ती माझ्या हातातून गेली आहे. २५ तारखेला माझ्या पेटीएममध्ये काहीतरी गडबड असल्याचं माझ्या लक्षात आलं. मला पेमेंट करता येत नव्हतं. जेव्हा मी ट्रन्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा मला केव्हायसी (KYC) चा मेसेज येत होता. त्यामुळे मी पेटीएम सपोर्टला मेसेज करुन मला KYC प्रोसेससाठी कोणताही फोन आलेला नाही आणि माझी २५००ची रक्कम ब्लॉक करण्यात आली. ज्याचा मी वापर करु शकत नाही, असं मृणालने सांगितलं.

वाचा : ‘तू सुंदर दिसत नाहीस’, म्हणत अभिनेत्रीला दिग्दर्शकाने नाकारलं

पुढे ती म्हणते, “त्यानंतर मला पेटीएमकडून फोन आला आणि त्यांनी मला KYC करण्यास सांगितलं. तसंच त्यांनी मला एक लिंकही पाठवली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर माझ्या अकाऊंटमधून ७५८ रुपये कमी झालं. त्यानंतर मी पुन्हा फोन करुन माझे पैसे गेल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे त्यांनी मला आणखी एक लिंक पाठवत तुमच्या अकाऊंटमधून गेलेले पैसे पुन्हा मिळतील असं सांगितलं. मात्र काही वेळातच अचानकपणे माझ्या खात्यातून २७ हजार रुपये काढले गेले”. दरम्यान, या घटनेनंतर मृणालने एफआयआर दाखल केली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात माझाच दोष असल्याचं बँक आणि पोलिसांचं म्हणणं आहे.