सलमान खान, कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाविरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘भारत’ हे शीर्षक लोकांच्या भावना दुखावणारे असल्याने ते बदलण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. येत्या ५ जून रोजी सलमानचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे.

विपिन त्यागी असं याचिकाकर्त्याचे नाव असून ‘भारत’ हे चित्रपटाचे शीर्षक देऊन कलम ३चे उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या कलमाअंतर्गत ‘भारत’ या नावाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ शकत नाही. शीर्षकासोबतच याचिकाकर्त्याने चित्रपटातील एका संवादावरही आक्षेप घेतला आहे. सलमान आपल्या नावाची तुलना देशाशी करताना ट्रेलरमध्ये दिसतो. हा संवाद भारतीयांच्या भावना दुखावणारा असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

‘भारत’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सलमानला विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आधी प्रियांका चोप्राने या चित्रपटातून काढता पाय घेतला. शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच तिने अचानक हा चित्रपट सोडला. त्यानंतर सलमानला ऐनवेळी कतरिना कैफला या चित्रपटात घ्यावं लागलं.

अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father”  या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये सलमानसोबत जॅकी श्रॉफ, कतरिना कैफ, सुनील ग्रोवर, दिशा पटानी, नोरा फतेही यांच्याही भूमिका आहेत.