मार्च महिन्यापासून देशावर करोना विषाणूचं सावट आहे. आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. त्यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शरद मल्होत्रा यालादेखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एका मुलाखतीत त्याने याविषयी माहिती दिली.
शरदला करोनाची लागण झाली असून त्याच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे सध्या तो होम क्वारंटाइन झाला आहे. तर त्याची पत्नी रिप्सी भाटिया हिचे रिपोर्टस् मात्र निगेटिव्ह आले आहेत.
“असं म्हटलं जातं की तुमच्यात सकारात्मकता असेल तर लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात. मात्र, मी हे वाक्य जरा जास्तचं गांभीर्याने घेतलं. मी करोना पॉझिटिव्ह आहे. अलिकडेच माझ्याच सौम्य लक्षणे जाणवली आहेत. सुदैवाने माझ्या पत्नीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मात्र, मी सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहे. योग्य काळजी घेत आहे आणि होम क्वारंटाइन झालो आहे. त्यामुळे मी लवकर बरा होण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा”, असं शरदने सांगितलं.
दरम्यान, शरद छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो छोट्या पद्यावरील ‘नागिन 5’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.