गेल्या काही दशकांमध्ये छोट्या पडद्यावर विविध मालिका, रिअॅलिटी शो, कार्यक्रम यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीमध्ये कायमच अव्वल स्थान मिळविण्यासाठी या कार्यक्रमांमध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतं. या साऱ्यामध्ये ‘सीआयडी’ हा क्राईम शो कायमच प्रथम स्थानावर असल्याच पाहायला मिळालं. मात्र हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु ही मालिका संपणार नसून काही काळ ब्रेक घेणार असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

येत्या २७ ऑक्टोबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. त्यामुळे २१ वर्ष यशस्वीरित्या वाटचाल करणारी ही मालिका बंद होणार असल्याचं समजताच चाहत्यांनी ट्विटरवर #SaveCID हा ट्रेंड सुरु केला होता. मात्र सोनी वाहिनीने एक परिपत्रक प्रसिद्ध करुन मालिका बंद होणार नसल्याचं म्हटलं आहे.

‘सीआयडी’ हा मालिका संपणार नसून केवळ काही महिन्यांसाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सीआयडी ही मालिका २७ ऑक्टोबरनंतर काही महिन्यांच्या ब्रेकवर जाणार आहे. मात्र या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे या नव्या भागामध्ये अधिक थ्रिलिंग पाहायला मिळणार आहेत, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाने आतापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असून एसीपी प्रद्युमन ही भूमिका अभिनेता शिवाजी साठम यांनी वठविली असून इन्स्पेक्टर दया ही भूमिका दयानंद शेट्टने पार पाडली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील कुछ तो गडबड है आणि दया तोड दो ये दरवाजा हे संवाद प्रचंड गाजले आहेत. त्यामुळेच ही मालिका आता बंद होणार असल्याचं समजताच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसून येत आहे.