काही वर्षांपूर्वी अभिनेता सलमान खानचा दबंग प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील चुलबूल पांडेने साऱ्याची मनं जिंकली म्हणून त्याचा सिक्वलही आला होता. या चित्रपटावरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. चुलबूल पांडेची स्टाईल, त्याचा रुबाब या साऱ्याने प्रेक्षकांना भूरळ घातली त्यानंतर आता या चित्रपटाचा प्रिक्वलदेखील लवकरच येणार आहे. ‘दबंग ३’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असून यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता झळकणार आहे.
अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटानंतर तो ‘दबंग३’ च्या चित्रीकरणाकडे वळणार आहे. येत्या एप्रिल महिन्यामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होणार आहे. ‘दबंग ३’ मध्ये सलमानसोबत पुन्हा एकदा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र खलनायकाची भूमिका कोण वठवणार याकडे साऱ्याचं लक्ष वेधलं होतं. आता तेही समोर आलं आहे. कन्नड अभिनेता किच्चा सुदीप हा या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका वठवणार आहे.
.@KicchaSudeep , you have taken what we started to another level, all the best and congrats to the MAN, to the PAILWAAN https://t.co/laQtS6WofQ
— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 15, 2019
सलमान आणि सुदीपला दीर्घ काळापासून एकत्र काम करण्याची इच्छा होती. मात्र काही कारणास्तव तो योग जुळून येत नव्हता. मात्र ‘दबंग ३’ च्या निमित्ताने या दोन्ही कलाकारांची इच्छा पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच सलमान-सुदीपची चांगली मैत्री झाली आहे. सलमानने काही दिवसापूर्वीच सुदीपच्या पहलवान या चित्रपटाचा टीझर सोशल अकाऊंटवर प्रदर्शित केला होता. सुदीप हा दाक्षिणात्य अभिनेता असून त्याचा ‘मक्खी’ (इगा)’ आणि ‘फूंक’ हे चित्रपट लोकप्रिय आहेत.