करोना व्हायरसमुळे शासनाने सर्वाना घरात राहण्याची व कोणत्याही धार्मिक स्थळी गर्दी न करण्याची विनंती केली आहे. आपण सर्वांनी  घरात राहून करोनाचा प्रसार टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत व सकारात्मक विचार करून या संकटाशी दोन हात केले पाहिजेत. या संकटामुळे आपण  सर्वजण या वर्षी आषाढी वारीला मुकलो आहोत. म्हणूनच “झी टॉकीज” आषाढी एकादशी निमित्त घेऊन येत आहे एक सांगीतिक नजराणा.

या कार्यक्रमाचे नाव आहे “बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल.” हा कार्यक्रम १ जुलै रोजी रात्री  ८. ३० वाजता प्रदर्शित होणार आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठला  साद घालण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या २ तासांच्या सांगीतिक भेटीत प्रेक्षकांना गायन, वादन, नृत्य, भारूड, भजन अशा अनेक कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात आर्या आंबेकर, आदर्श शिंदे, कार्तिकी गायकवाड, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, आदिनाथ कोठारे हे सर्व लाडके कलाकार व गायक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

जेष्ठ किर्तनकार  ह. भ.  प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन सादर होणार आहे. तर धुंडा महाराजांचा आदर्श घेवून भारूड सादरीकरणाला सुरूवात करणाऱ्या, भारूडाची पंरपरा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील जेष्ठ लोककलावंत “चंदाताई तिवाडी” भारूड सादर करणार आहेत.

या कठीण काळात  पांडुरंगाशी एकरूप होत, सकारात्मक राहण्याची प्रेरणा आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची एक अनोखी  संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.