छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आणि अभिनेते केडी चंद्रन यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. रविवारी १६ मे रोजी जुहूमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

सुधा चंद्रनचे वडील केडी चंद्रन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनाची बातमी ही स्वत: सुधा यांनी दिली आहे. ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वडिलांच्या निधनाचे कारण सांगितले आहे. सुधा यांचे वडील हे डेमेंटिया नावाच्या आजाराने ग्रस्त होते. १२ मे रोजी त्यांना जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच १६ मे रोजी त्यांचे निधन झाले.

तर या आधी सुधा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या वडिलांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. “गुडबाय अप्पा..आपण पुन्हा भेटू … तुमची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे …. मी तुम्हाला वचन देते की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या शिकवणीचे आणि अनुभवांचे आणि तुमच्या मूल्यांचे पालन करेन… परंतु माझा एक भाग तुमच्यासोबत गेला आहे अप्पा … रवी आणि सुधा तुमच्यावर अनंतकाळ प्रेम करतो…. देवाला प्रार्थना करते की मी पुन्हा तुमची मुलगी होईल. ओम शांती,” असे कॅप्शन देत सुधा यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

केडी चंद्रन यांनी ‘हम हैं राही प्यार के’, ‘चाइना गेट’, ‘जूनून’, ‘पुकार’, ‘कॉल’, ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘तेरे मेरे सपने’, ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘शरारत’ और ‘कोई मिल गया’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.