अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आता त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी दिशा ही सुशांतची मॅनेजर नव्हती असा खुलासा केला आहे. इतकच नाही तर सुशांत आणि दिशा यांच्यामध्ये कोणतेही नाते किंवा चांगली मैत्री नव्हती असंही म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा आणि सुशांत हे केवळ २३ दिवस एकमेकांच्या संपर्कात होते. दिशा कॉर्नर स्टोन नावाच्या कंपनीमध्ये सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करायची. कंपनीने दिलेल्या कामासंदर्भात ती १ एप्रिल २०२० ते २३ एप्रिल २०२० दरम्यान सुशांतच्या संपर्कात होती. हे दोघे एकमेकांशी अवघ्या २३ दिवस संपर्कात राहिल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

एप्रिल महिन्यातील या २३ दिवसांच्या कालावधीनंतर सुशांत आणि दिशा यांच्या दरम्यान कोणतीही चर्चा झाली नाही. मुंबई पोलिसांनी दिशाची कंपनी, तिचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींची चौकशी केल्यानंतर ही माहिती मिळवली आहे. मुंबई पोलिसांनी दिशा आणि सुशांतच्या फोन रेकॉर्डचाही तपास केला आहे. यामधून दोघांमध्ये केवळ प्रोफेशनल स्तरावरील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअपवरील संवादाचे स्क्रीनशॉर्ट असल्याचा दावा एबीपी न्यूजने केला आहे. याच स्क्रीनशॉर्टच्या आधारे या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं होतं यासंर्भातील बातमी एबीपी न्यूजने दिली आहे.  या दोघांनाही वेगवेगळ्या कंपन्यांशी संदर्भात ब्रेॅण्ड प्रमोशनबद्दल चर्चा केल्याचे स्क्रीनशॉर्टमधून दिसून येत आहे.

सुशांतची एक्स मॅनेजर असल्याचे सांगण्यात येणाऱ्या दिशाने ८ जून रोजी आत्महत्या केली होती. दिशाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ६ दिवसांनी म्हणजेच १४ जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्याने दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का यासंदर्भात चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी या दोघांनी एप्रिलमध्ये एकमेकांशी शेवटचा संवाद साधला होता असं म्हटलं आहे.

१ एप्रिल २०२०

सुशांतने दिशाबरोबर व्हॉट्सअपवर संवाद साधला. दिशाने सुशांतशी खाद्यतेलाच्या एका ब्रॅण्ड प्रमोशनसंदर्भात चर्चा केली होती.

दिशा – खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेल कंपनीबरोबर एका वर्षाच्या ब्रॅण्ड अँबेसिडर होण्यासंदर्भातील प्रस्ताव आहे. एक दिवस शुटींग करावी लागेल. अर्धा दिवस टीव्हीसीसाठी रेकॉर्डींग आणि उत्सवांच्या दिवसांमध्ये डिजीटल माध्यमातून तेलाशीसंदर्भात तीन पोस्ट कराव्या लागतील असा प्रस्ताव आहे. मी त्यांना यासाठी ६० लाख रुपये फी सांगू का, यासंदर्भात कळवा प्लीज.

सुशात – ब्रॅण्डचे नाव काय आहे?

 

दिशा – त्या लोकांना आता ब्रॅण्डचे नाव उघड करायचे नाहीय. आपण हा ब्रॅण्ड कशासंदर्भात आहे याची माहिती घेऊन पुढील चर्चा करुयात

सुशांत – ओके, कूल, थँक यू…

७ एप्रिल २०२०

सुशांत आणि दिशामध्ये पब्जी गेमच्या प्रोमशनसंदर्भात चर्चा झाली.

दिशा – हाय सुशात, पब्जी एक डिजीटल कॅम्पेन करत आहे. ज्यामध्ये कंपनी लोकांना घरीच थांबा, सुरक्षित राहा आणि पब्जी खेळा असा संदेश देऊ इच्छिते. तुला यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करावा लागेल. तुला हे कॅम्पेन करायला आवडेल का हे मला जाणून घ्यायचं आहे. यासंदर्भात आपण पुढे चर्चा करुयात का हे मला कळवं प्लीज. जर तुला प्रस्ताव आवडला तर मी पबजी कंपनीबरोबर व्हिडिओ स्क्रीप्टसंदर्भात चर्चा करते.

सुशात – हा प्लीज

दिशा – थँक्स… पब्जीकडे मी स्क्रीप्टसंदर्भात विचारणा करते.

१० एप्रिल २०२०

दिशाने सुशांतला पब्जी कंपनीबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली.

दिशा – हाय सुशात, पब्जीने कनफॉर्मेशन दिलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता मी चांगली डील केली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी पब्जी कंपनी १२ लाख रुपये आणि कर म्हणून आकारण्यात येणारी सर्व रक्कम भरण्यास तयारी झाली आहे. पुढील आठवड्यात या व्हिडिओची स्क्रीप्ट कंपनी आपल्या सोबत शेअर करेल. तुझे सल्ले स्क्रीप्टमध्ये जोडण्यात यावेत असं मी त्यांना सांगितलं आहे. मी यासंदर्भात तुला अपडेट देईल.

११ एप्रिल २०२०

सुशांतने दिशाच्या मेसेजला उत्तर दिलं

सुशांत – नक्कीच, स्क्रीप्ट येऊ देत मग आपण यावर निर्णय घेऊ

दिशा – होय नक्कीच

‘सिम्पसन’ला नकार रियामुळे?

७ एप्रिल ते ११ एप्रिलदरम्यान सुशांत आणि दिशादरम्यान पब्जीच्या प्रमोशनसंदर्भात चर्चा झाली. पुढच्याच दिवशी म्हणजे १२ एप्रिल रोजी ‘डिस्ने हॉटस्टार’वर १५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिम्पसन या कार्यक्रमाच्या प्रमोशनसंदर्भात चर्चा झाली. दिशाने ‘डिस्ने हॉटस्टार’चा मेसेज सुशांतला फॉरवर्ड केला. “आम्ही सिम्पसनच्या ३१ भागांचे ‘डिस्ने हॉटस्टार’वर १५ एप्रिल रोजी प्रीमियम करत आहोत. याचे प्रमोशन करण्यासाठी आम्हाला काही सेलिब्रिटींची आवश्यकता आहे. यामध्ये सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबियांचे कार्टून कॅरेक्टर बनवले जातील. या कार्टूनला सिम्पसनप्रमाणे बनवले जाईल. आम्ही सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबियांचे हसऱ्या चेहऱ्याचे आणि नॉर्मल हावभाव असणारे कार्टून बनवणार आहोत. सेलिब्रिटींनी ते आपल्या सोशल मिडिया हॅण्डलवरुन १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान पोस्ट करायचे आहेत,” असा मजकूर या मेसेजमध्ये होता.

‘डिस्ने हॉटस्टार’चा हा मेसेज पाठवून दिशाने सुशांतला, “सुशांत ‘डिस्ने हॉटस्टार’ सिम्पसनच्या प्रमोशनसाठी विचारत असून तू आणि रिया एकत्र काम कराल का असंही विचारत आहेत. हे योग्य आहे असं तुला वाटत असलं तर मला कळवं. यासाठी त्यांना किती फी सांगू हे ही कळवं. मी तुझ्या उत्तराची वाट पाहतेय,” असं मेसेज पाठवला. सुशांतने यावर “नाही, हे मला चांगलं वाटतं नाहीय,” असा रिप्लाय दिशाला दिला. सुशांतने हे कॅम्पेन फारसं पटलं नाही असं सांगत मला हे करण्याची इच्छा नाही असं दिशाला कळवलं. सुशांतने रियाचा समावेश असल्याने या ऑफरला नकार दिला का असा प्रश्न एबीपीने उपस्थित केला आहे.

सोशल मिडियावर चर्चांना उधाण

 

अशाप्रकारे सुशांत आणि दिशामध्ये २३ एप्रिलपर्यंत वेगवेगळे ब्रॅण्ड आणि प्रोमोशन तसेच जाहिराती, इतर प्रमोशनल गोष्टींबद्दल चर्चा होत होती. याशिवाय दोघांमध्ये काहीच बोलणे झाले नाही. सोशल मिडियावर सुशांत आणि दिशाशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल चर्चा आहे. दोघांचे मैत्रीचे संबंध होते, दोघांमध्ये मैत्रीहूनही बरचं काही होतं अशा बऱ्याच अफवा सोशल मिडियावर पसरवल्या जात आहेत. दिशाच्या मृत्यूबद्दल कळल्याने सुशांतला धक्का बसल्याचेही सांगितले जात आहे.

दिशाबरोबर नाव जोडल्याने सुशांत चिंतेत होता

दिशा कधी सुशांतची मॅनेजर नव्हती. मात्र दिशाच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी तिला उल्लेख सुशांतची मॅनेजर असा करण्यात आला. दिशाच्या मृत्यूमुळे सुशांत खूपच तणावामध्ये होता. माझं नाव या प्रकरणाशी जोडलं जाईल असंही त्याने काही जवळच्या लोकांना सांगितलं होतं. सुशांत यामुळे खूपच चिंतेत होता की दिशाच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टींबद्दल उलटसुटल चर्चा होतील. दिशाबरोबर आपला काहीच थेट संबंध नसताना या गोष्टींबद्दलच्या चर्चा व्हायरल होतील याबद्दलही सुशांतने चिंता व्यक्त केली होती.