बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि ईडीमार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. परंतु सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दिवसेंदिवस या मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढतच चाललं आहे. दरम्यान नंदिनी शर्मा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “सुशांत आत्महत्या करुच शकत नाही, त्याच्या आयुष्यात अनेक ध्येय होती. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील भेटायचं होतं”, असा खुलासा त्यांनी केला आहे.

अवश्य पाहा – बदला घ्यायला येतेय नवी ‘नागिन’; एकता कपूरने शेअर केले अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

सुशांतने ‘इनसाइड वेन्च्योर्स प्राइवेट लिमिटेड’ नावाची एक कंपनी सुरु केली होती. ही कंपनी २०१९मध्ये बंद पडली. नंदिनी शर्मा या कंपनीच्या कम्यूनिकेशंस हेड होत्या. त्यांनी रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या भविष्यकालीन योजनांबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “सुशांत एक महत्वाकांक्षी व्यक्ती होता. चित्रपटांव्यतिरिक्त त्याची अनेक ध्येय होती. त्याला एक अॅप तयार करायचं होतं ज्या अॅपद्वारे विद्यार्थांना मोफत शैक्षणिक माहिती, पुस्तकं व कॉलेजच्या नोट्स वगैरे मिळणार होत्या. यासाठी तो नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार होता. शिवाय त्याला सायंन्स फिक्शन चित्रपट तयार करायचे होते. यासाठी त्याने तयारी देखील सुरु केली होती. असा महत्वाकांक्षी व्यक्ती आत्महत्या का करेल?” असा सवाल नंदिनी शर्मा यांनी उपस्थित केला आहे.

अवश्य पाहा – सासू-सुनेच्या भांडणावर रॅप साँग; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

सुशांत प्रकरणात आलं नवं वळण

सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. सीबीआयची १० सदस्यीय टीम मुंबईत दाखल झाली आहे. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तपास करत आहे. सीबीआय टीमकडून सुशांतच्या स्टाफ कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली आहेत. यामध्ये सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवालाचाही समावेश आहे.