करोना विषाणूमुळे संपूर्ण देशाची घडी विस्कटली आहे. लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यातच उद्योगधंदे बंद झाल्यामुळे अनेक परराज्यातील लोक त्यांच्या घरी जाण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी अभिनेता सोनू सूद कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यातच आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री स्वरा भास्करही ही या मदतकार्यात पुढे सरसावली आहे. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची जबाबदारी घेतल्याचं सांगितलं आहे.

एकीकडे सोनू सूद मजुरांना सर्वतोपरीने मदत करत आहे. यात मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यापासून ते त्यांच्या जेवणाची सोय करण्यापर्यंत बरंच काही करत आहे. यातच स्वरा भास्करही या मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. तिने परराज्यातून दिल्लीत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

स्वराने अलिकडेच तिच्या हेल्प कॅम्पमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दिल्लीत अडकलेल्या प्रवाशांना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परत पाठविण्याविषयीच्या आमच्या पोस्टला ट्विटरवर ७० पेक्षा जास्त जणांनी प्रतिक्रिया दिली होती, असं स्वरा म्हणाली.


दरम्यान, सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणाऱ्या स्वरावर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे सध्या ‘लेडी सोनू सूद’ या नावाने तिची चर्चा रंगत आहे.