छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका फारच लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचा एक चाहतावर्ग आहे. यामध्ये नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यापुढे मालिकेत दिसणार नसल्याची जोरदार चर्चा आहे. जवळपास अडीच महिने लॉकडाउननंतर शूटिंगला जरी परवानही देण्यात आली असली तरी सरकारने काही नियम आखले आहेत. या नियमांअंतर्गत ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या कलाकारांना शूटींगला जाण्यास मनाई आहे. त्यामुळे आता नट्टू काका मालिकेत दिसणार की नाही, अशी चर्चा चाहत्यांमध्ये होती.

यावर मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “वृद्ध कलाकारांकडे उत्पन्नाचं दुसरं काही साधन नसतं. त्यांच्या खर्चाचाही मोठा प्रश्न असतो. जे छोटं-मोठं काम करतात, दुकान चालवतात त्यांना परवानगी आहे. पण वृद्धांना शूटिंग करण्यास परवानगी नाही. अशा वेळी त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका कोण साकारणार? सर्वांनी एकत्र येऊन या नियमाचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे.”

आणखी वाचा : ‘मस्त चाललंय आमचं’ म्हणणाऱ्या सेलिब्रिटींना दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फटकारलं

सरकारने शूटिंगला परवानगी देताना कलाकार व क्रू मेंबर्सच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे सेटवर कमीत कमी लोक उपस्थित असतील याचीही काळजी घेण्यास सांगितले आहे.