शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाबाबत मागच्या काही दिवसांपासून बरीच चर्चा आहे. मराठीजनांमध्ये प्रिय असलेल्या या नेत्याची भूमिका कोण साकारणार याबाबत मोठी उत्सुकता होती. नवाजुद्दीन सिद्दीकी याची या भूमिकेसाठी वर्णी लागल्यावरही काही दिवसांपूर्वी अजय देवगण हे काम करणार असे बोलले जात होते. मात्र चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता चित्रपटाचे कामही सुरु झाले आहे. नुकतेच चित्रपटाचे डबिंग सुरु झाले असून नवाजुद्दीनने स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली. इतकेच नाही तर नवाजने हे ट्विट चक्क मराठीमध्ये केले.

या ट्विटमध्ये त्याने मराठीमध्ये लिहीले आहे, ” माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो, आजपासून डबिंगची सुरुवात केली आहे.” असे म्हटले. त्यामुळे नवाजने मराठीच्या सरावाला चांगलीच सुरुवात केल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनचे नाव नक्की झाल्यावर हिंदी अभिनेता मराठी कसे बोलणार अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसत होती. त्याबाबत नवाजला अनेक प्रश्नही विचारण्यात आले होते. त्यावेळी तो म्हणाला होता, मी सगळ्यांना खात्रीनं सांगतो की बाळासाहेब ठाकरेच मला मराठी बोलण्याची प्रेरणा देतील, आशीर्वाद देतील आणि त्यांची लाडकी भाषा मराठी माझ्यावर तेवढंच प्रेम करेल.’

इतकया मोठ्या अभिनेत्याने मराठीत ट्विट केल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र काहींनी त्याने लिहीलेल्या पोस्टमधील चुका काढत योग्य शब्द कसा आहे तेही लिहून दाखवले आहे. अवघ्या दोन तासात नवाजच्या या ट्विटला सोशल मीडियावर खूप जास्त प्रतिसाद मिळाला आहे. बाळासाहेबांची भूमिका नवाज अतिशय नेमकी साकारेल असा विश्वास सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. हा चित्रपट २३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.