बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनया सोबतच तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. शिल्पाचे लाखो चाहते आहेत. त्या चाहत्यांसाठी शिल्पा नेहमीचे वेगवेगळ्या हेल्थ टिप्स घेऊन येत असते. आता शिल्पाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून दिवसाची सुरूवात कशी केली पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न शिल्पाने केला आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा एकदम शांत असून ती योगा करताना दिसत आहे. त्यासोबत तिने सगळ्यांना हेल्थ टिप्स दिल्या आहेत. “काही वेळ निसर्गासोबत रहा, मोकळा श्वास घ्या आणि निसर्गाचा आनंद घ्या.” असं शिल्पाने या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ काही दिवसांपुर्वी ती मनालीला गेली होती तेव्हाचा आहे. मनालीत असताना ती रोज सकाळी उठून निसर्गाचा आनंद घ्यायची असं तिनं म्हंटलं आहे

पुढे ती म्हणाली, “या दिवशी मी पश्चिमोत्तानासन किंवा फॉरवर्ड बेंड पोज करण्याचा निर्णय घेतला होता. हे सोप दिसत असेल, परंतु यामुळे आपली कंबर, खांदे आणि हॅमस्ट्रिंग्सला ज्या आवश्यक स्ट्रेचची गरज आहे तो मिळतो. यामुळे आपल्या पेल्विकमध्ये रक्त प्रवाह होण्यास मदत होते. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला वाकता येत नाही आहे, किंवा शरीर ताठ झाले आहे. तेव्हा तुम्ही हे योगासन करा. परंतु शारीरिकदृष्ट्या जेवढं शक्य असेल तेवढच करा आणि जर तुमच्या पाठीचा कणा किंवा पाठीचा भाग, कंबर आणि हिप्सच्या भागात काही दुखापत झाली असेल तर या योगासनात थोडे बदल करा”, अशा आशयाचे कॅप्शन शिल्पाने त्या व्हिडीओला दिले आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला ६ लाख पेक्षा जास्त व्ह्युज आहेत.

शिल्पा शेट्टी लवकरच दोन चित्रपट घेऊन मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘निकम्मा’ असे एका चित्रपटाचे नाव आहे. तर ‘हंगामा २’ असे दुसऱ्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून शिल्पा अनेक वर्षांनंतर चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे.