नवी दिल्लीतील विज्ञाना भवनात आज ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. मात्र पुरस्कार वितरणाआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याचं कळताच काही कलाकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार होतं, त्यामुळे अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यात गैर नाही त्यामुळं काही पुरस्काराची किंमत कमी होत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ते राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले याचा मला आनंद वाटला. यात स्मृती इराणी कमी आहेत किंवा त्यांना खाली दाखवण्याचे काही कारण नाही. पण ही वेळ जर माझ्यावर आली असती तर मी नाराजी बोलून दाखवली नसती. मी कुण्याचाही हातून जर पुरस्कार घेतला तर त्याची किंमत काही कमी होत नाही’, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडली.

संवाद -मराठी चित्रपट संमेलनात नाना पाटेकर यांच्या हस्ते विक्रम गोखलेंचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम झल्यांनातर नाना पाटेकर हे पत्रकारांशी बोलताना स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नाराजी व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद अनुपस्थित राहणार असल्यानेच विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर मराठी कलाकार प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी हा पुरस्कार अखेर स्विकारला. काही वेळानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुरस्कार वितरणासाठी उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बालगंधर्व रंगमंदिर नव्याने उभारण्यात येणार असून त्याला काही कलावंत आणि साहित्यिकांनी विरोध केला आहे, या प्रश्नावर नाना पाटेकर म्हणाले की, नव्याने अधिक चांगली बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू उभारली जात असेल आणि जादा एफएसआय मिळत असल्यावर बालगंधर्व नाट्यगृह पाडायला हरकत नाही. अशी भूमिका मांडत ते पुढे म्हणाले की, चांगल्या सुविधा मिळत असतील तर त्यास कोणीही विरोध करू नये. तसेच उगाच जुनी वास्तू आहे, आमच्या काळात असे होते म्हणण्यात अर्थ नाही. नाट्यवेडा प्रेक्षक येतोच. त्यामुळे नवीन नाट्यगृह बांधायला उशीर झाला तरी प्रेक्षक गमावतील असे वाटत नाही अशा शब्दात विरोध करणाऱ्या नाना पाटेकर यांनी त्यांच्या खास शैलीत सुनावले.