News Flash

‘दक्षिणायन’तर्फे अजेय चित्रपट मालिका

या चित्रपटाच्या प्रदर्शनाने अजेय चित्रपट मालिकेची सुरुवात होणार आहे.

 

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यामध्ये ६० ठिकाणी आयोजन

स्वायत्त ऊर्जेने बंधनमुक्त होत एकत्रित येऊन एक अभेद्य मानवी साखळी करण्याचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशातून ‘दक्षिणायन’ चळवळीतर्फे अजेय चित्रपट मालिकेची सुरुवात होत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी (८ मार्च) महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये ६० ठिकाणी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर आणि लेखिका संध्या गोखले यांनी या मालिकेतील चित्रपटांची निवड केली आहे.

नव्या पिढीची अवस्था जोखडमुक्त असण्यातले स्वातंत्र्य न भोगलेल्या हत्तीसारखी होऊ नये, या प्रेरणेतून अजेय चित्रपट मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्णपणे विनामूल्य असलेल्या या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोठय़ा संख्येने घ्यावा, असे आवाहन अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी झगडणारे ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि अमोल पालेकर यांनी केले आहे. वणवा पेटवण्याचे सामथ्र्य असलेल्या ठिणगीला तळहातावर सतत तापत ठेवण्याची गरज आहे, अशा शब्दांत गणेश देवी यांनी नव्या पिढीने जागतं राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक क्षणी आपण आणि आपला भोवतालही बदलत असतो. सरलेल्या क्षणांनंतरच्या नव्या घडीला आपण कसे सामोरे जातो यावरून वैयक्तिक आणि सामूहिक भविष्याचा कस आणि दिशा ठरते. त्या कसोटीच्या क्षणाला, बुरसटलेल्या रुढींच्या, अंधविश्वासाच्या किंवा खोटय़ा भिंतींच्या कुंपणात अडकून राहण्याऐवजी स्वतंत्र विचारांचा मोकळा श्वास घेत जगणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा या चित्रपटांच्या रंजक कहाण्यांमधून आपल्याला भेटत राहतील. स्वतत्त्वांसाठी लढा देत, न्याय मिळवण्यासाठी किंवा सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या त्यांच्या धडपडीतून आपल्याला ताकद मिळेल. निदान त्या निर्णायक क्षणी त्यातील कोणते तरी पात्र आपल्याला प्रेरित करेल, अशा विश्वासातून या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

विल्यम हेन्ली या इंग्लिश कवीच्या ‘इनव्हिक्टस’ या कवितेतील संदेशाने नेल्सन मंडेला यांना २७ वर्षांच्या कारावासातून तारून नेले. वर्णद्वेषाने शोषित दक्षिण आफ्रिकेतील समाज एकसंध ठेवण्यासाठी मंडेला यांनी रग्बी या खेळाचा कसा उपयोग करून घेतला, ती सत्यकथा अभिनेता क्लिंट इस्टवूडने या चित्रपटातून समोर आणली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाने अजेय चित्रपट मालिकेची सुरुवात होणार आहे.

नव्या पिढीला भावणारे चित्रपट

नव्या पिढीलीही भावतील असे समकालीन चित्रपट निवडण्यात आले आहेत. परकीय भाषेतील संवाद इंग्रजी ‘सबटायटल्स’च्या मदतीने समजून घेण्याची सवय करून घेत युवक नव्या अनुभवांना सामोरे जातील, असे संध्या गोखले यांनी सांगितले. स्फूर्ती, प्रेरणा या संकल्पनांच्या कक्षाही या प्रयोगातून आजमावता येतील, असेही त्या म्हणाल्या.

३१ एप्रिलपर्यंत दाखविल्या जाणाऱ्या नऊपैकी सात चित्रपटांतून आफ्रिका, ब्राझील, अमेरिका, इग्लंड या देशांतील स्वयंप्रेरित व्यक्तींची सामाजिक परिस्थिती लक्षात येईल. चार चित्रपटांतून स्त्रियांनी अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढय़ांच्या कथा पाहावयास मिळतील. मे-जूनमध्ये रजा घेऊन महाविद्यालये सुरू झाल्यानंतर पुढील वर्षभर ही मालिका सुरू ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे.

संध्या गोखले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:35 am

Web Title: unstoppable movie series
Next Stories
1 चित्ररंग : हाणामारीचा ‘विद्युत’घट!
2 सेटवर असा साजरा झाला टायगरचा बर्थडे
3 शामक दावरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
Just Now!
X