विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित झाला. जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला. या चित्रपटानं आतापर्यंत अनेक विक्रम रचले. हे विक्रम कोणते ते पाहू

– २०१९ मधला पहिला सुपरहिट चित्रपट
‘उरी’ हा २०१९ मधला पहिला सुपरहिट चित्रपट ठरला आहे. भारतीय जवनांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटानं १०८ कोटींचा गल्ला जमवला आहे.

– कमी कालावधीत १०० कोटींचा टप्पा गाठला
‘उरी’ हा चित्रपट बॉलिवूडमधल्या कमी बजेट असलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटानं १० दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवला. यापूर्वी ‘तनू वेड्स मनू’ या कमी बजेट असलेल्या चित्रपटानं अल्पावधीत १०० कोटींचा गल्ला जमवला होता.

– विकी कौशलचा सुपरहिट चित्रपट
‘उरी’ हा विकी कौशलच्या करिअरमधला पहिला सुपरहिट चित्रपट आहे. १०० कोटींचा टप्पा पार करणारा आणि त्याची प्रमुख भूमिका  असलेला पहिलाच चित्रपट आहे.

– स्वत:च्याच चित्रपटाचा मोडला विक्रम
गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ चित्रपटानं १०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. या चित्रपटात आलिया भट्ट ही प्रमुख भूमिकेत होती. तर विकी कौशल हा तिच्या पतीच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता. ही भूमिका आलीयाच्या तुलनेत खूपच लहान होती. या चित्रपटाच्या एकूण कमाईचा विक्रमही उरीनं मोडला आहे.

-दुसऱ्या आठवड्यातही विक्रमी कमाई
‘उरी’नं पहिल्याच आठवड्यात ३५ कोटींची कमाई केली. मात्र दुसऱ्या आठवड्यात अनेक चित्रपटांच्या कमाईचे आकडे हे घसरत जातात. पण असं असतानाही दुसऱ्या आठवड्यातही ‘उरी’नं सर्वाधिक कमाई केली. उरीनं दुसऱ्या आठवड्यात ३७. ७५ कोटींची कमाई केली आहे.