अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला दोन महिने लोटले आहेत. सुशांत सिंहनं आत्महत्या केल्यानंतर त्यानं हे नैराश्यातून केल्याचं प्रथम दर्शनी दिसून आलं होतं. मात्र, त्यानंतर वेगवेगळ्या शंका आणि प्रश्न उपस्थित केल्यानंतर यांचा तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोटवरून सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी नवीन शंका उपस्थित केली आहे.

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र विरुद्ध बिहार असं चित्र निर्माण झालं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं बिहार सरकारच्या शिफारशीवरून सीबीआयकडे सोपवला आहे.

त्यातच के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी नवीन शंका उपस्थित केली आहे. “सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मी पाहिला आहे. त्यात त्याच्या मृत्यूच्या वेळेचाच उल्लेख नाही, जी की महत्त्वाची माहिती आहे. त्याला मारल्यानंतर फाशी देण्यात आली की फाशी घेऊन मरण पावला हे मृत्यूच्या वेळेवरून स्पष्ट केलं जाऊ शकतं,” असं विकास सिंह यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्र व बिहार ही दोन्ही राज्य आमनेसामने आल्याचं बघायला मिळत आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं त्याला विरोध केला आहे. शिफारस करण्याचा अधिकारच बिहार सरकारला नसल्याचं महाराष्ट्रानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.