मानसी जोशी, मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात २०१९ ची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी लक्षात राहिली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी पक्षांनी केलेला खटाटोप आणि त्यांनी खेळलेल्या राजकारणाचे डावपेच ही या निवडणुकीची ठळक वैशिष्टय़े ठरली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातले हे शह  काटशहाचे राजकारणलवकरच भाडिपाच्या डिजिटल मंचावर दिसणार आहेत. ‘इंडिया टुडे’ ग्रुपचे उपसंपादक कमलेश सुतार यांनी लिहिलेल्या ‘३६ डेज’ या पुस्तकाचे ‘भाडिपा’ने हक्क विकत घेतले असून त्यावर लवकरच वेब सीरिजची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती ‘भाडिपा’चे सारंग साठय़े यांनी दिली.

गेल्या वर्षीची महाराष्ट्राच्या राजकारणातील नाटय़मय आणि रोमांचकारी प्रसंगांनी भरलेली विधानसभेची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. या निवडणुकीची रोमांचित कहाणी ‘इंडिया टुडे’ ग्रुपचे उपसंपादक कमलेश सुतार यांनी ‘३६ डेज’ या पुस्तकातून मांडली आहे. मराठीत दर्जेदार आशयाची निर्मिती करणाऱ्या भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे ‘भाडिपा’ याचे डिजिटल रूपांतर करणार आहे. यासाठी भाडिपाने पुस्तकाचे हक्क विकत घेतले असून  कथेवर कामही करण्यास सुरुवात केली आहे.

अनेक दिवसांपासून आम्ही चांगल्या कथेच्या शोधात होतो. या दरम्यान कथेसाठी दर्जेदार आशयाच्या शोधात असताना ‘३६ डेज’ हे पुस्तक वाचनात आले. या निमित्ताने शरद पवारांचे पावसातील भाषण, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि या घटनांविषयी माहिती नसलेले पैलूही वाचायला मिळाले. हे पुस्तक वाचल्यावर यावर संपूर्ण एक चित्रपट तयार होईल याची जाणीव झाली. यात कोणीही नायक, खलनायक अथवा चांगले-वाईट नाही. दृकश्राव्य माध्यमासाठी साजेसे लिखाण आणि वर्णन केलेल्या लोकांची दुटप्पी भूमिका यामुळे हे पुस्तक ऑनलाइन रूपांतरण करण्यासाठी योग्य वाटले. आम्हाला ही कथा जशी घडली आहे तशीच दृकश्राव्य माध्यमाद्वारे मांडायची आहे. त्यानुसार आम्ही प्रकाशकांकडून पुस्तकाचे हक्क विकत घेतले. नुकतेच या वेब सीरिजच्या कथानकावर काम सुरू झाले असल्याचे सारंगने सांगितले.

राजकारणासारखा संवेदनशील विषय म्हटला की, वादाला तोंड फुटते. राजकारणावर आधारित वेब सिरीज तयार करताना आम्ही वादात्मक प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करणार आहोत. या वेब सीरिजमध्ये समोरच्या माणसाची स्तुती अथवा टीका करताना त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. विनोदाच्या कार्यक्रमात जसे उपरोधिकपणे टीकाटिप्पणी करताना संबंधित व्यक्ती अथवा समूहाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेतो. हेच तत्त्व या ठिकाणीही लागू पडते. हे पुस्तक प्रकाशित होऊन दोन महिने झाले असून आतापर्यंत कोणताही वाद निर्माण झाल्याचे ऐकिवात नाही. हे पुस्तक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाचले आहे, अशी माहितीही त्याने दिली.

कोणत्याही कथेचे वेब सीरिजमध्ये रूपांतर करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.  ‘बेताल’ तसेच ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिज पुस्तकांवर आधारित आहे. पुस्तकांवरून वेब सीरिज करताना वास्तव आणि आभासी जगाचे भान ठेवावे लागते. पुस्तकातील कथा पडद्यावर अजून आकर्षक कशी तयार करायची हे जास्त आव्हानात्मक आहे. मूळ कादंबारीला धक्का न लावता त्यातील नाटय़ जिवंत ठेवण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल, असेही सारंगने सांगितले.

गेल्या वर्षीची राज्यातील विधानसभेची निवडणूक ही देशातील बातम्यांचा तसेच चर्चेचा विषय ठरली होती. देशातील प्रत्येक प्रसारमाध्यमाने याची दखल घेतली होती. या वेब मालिकेची व्याप्तीही त्याच दर्जाची असेल. भाजप, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे राजकारण हे सर्वसामान्य माणसाच्या कुतुहलाचा विषय असतो. त्यामुळे या विषयावरील सीरिज पाहण्यास प्रेक्षकांना मजा येईल. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येईल. याआधी ‘भाडिपा’ने निर्मिती केलेल्या ‘पांडू’ आणि ‘वन्स अ इयर’ या दोन्ही वेब सीरिज विविध प्रकारातील आहेत. या दोन्ही वेब सीरिजना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. याचबरोबर भाडिपातर्फे आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वयातील प्रेमाची कथा हाताळतो आहोत, असेही सारंगने स्पष्ट केले.

टाळेबंदीमुळे ऑनलाइन आशय पाहण्याचे प्रमाण वाढले

टाळेबंदीमुळे प्रेक्षकांना डिजिटल आशयाचे महत्त्व कळले आहे. घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने प्रेक्षकांनी ऑनलाइन मालिका, वेब सीरिज पाहण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. आमची ‘पांडू’ ही मालिका झी वाहिनीवर दाखवण्यात आली. याआधी टीव्हीवरील मालिका ओटीटीवर दाखवण्यात येत होत्या. वेब सीरिज टीव्हीवर प्रसारित होणे ही मोठय़ा बदलाची नांदी असल्याचे सारंगचे मत आहे. टाळेबंदीची चांगली बाजू स्पष्ट करताना त्याचे दुष्परिणामही सांगितले. मालिकांचा चमू कमी केल्याने अनेक तंत्रज्ञांच्या पोटावर पाय आला आहे. कारण मालिकांचे चित्रीकरण करताना मोठय़ा उपकरणांसाठी दोन ते तीन माणसे लागतात. मात्र आता हेच काम एकटय़ाला करावे लागते आहे. आतापर्यंत आमच्या मालिकेचे भाग आम्ही घरूनच चित्रित करत होतो. मात्र आता आम्ही चित्रीकरण स्थळी जाऊन हा भाग चित्रित केला. सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आम्ही चित्रीकरण करत आहोत. चमूची दोन विभागात विभागणी करून आम्ही चित्रीकरण केले असून प्रत्येकाने  घरूनच जेवणाचे डबे आणले होते, असेही सारंगने सांगितले.