News Flash

अभिनयातील ‘मुक्ता’ संचार

मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील यशस्वी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेची ओळख आहे.

|| भक्ती परब

मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील यशस्वी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेची ओळख आहे. या तिनही माध्यमांतून तिने आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडवलं. ‘एक डाव धोबीपछाड’, ‘जोगवा’ चित्रपटांनंतर तिच्या यशाचा आलेख उत्तरोत्तर उंचावत गेला. ‘मुंबई पुणे मुंबई ३’ या चित्रपटाच्या यशानंतर मुक्ताचा ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, तर ‘स्माइल प्लीज’ आणि ‘बंदिशाळा’ हे चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. या निमित्ताने मुक्ताशी साधलेला संवाद..

लग्नाची पाश्र्वभूमी असलेले चित्रपट अधिक केले ही गोष्ट खरी आहे, पण हा योगायोग असू शकेल, अशी गप्पांना सुरुवात करून आगामी ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील भूमिकेविषयी मुक्ता म्हणाली, कोणत्याही परिस्थितीत आपण खरं वागलो असू तर आपल्याला काही ना काही नवं सापडतं, असा दृष्टिकोन देणारी माझी भूमिका आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मी दिग्दर्शिकेची भूमिका करतेय. तिने चित्रपट माध्यमाचं शिक्षण घेतलंय. त्यातून तिला खूप काही मांडायचं आहे, पण तिच्या मनाविरुद्ध तिला प्री-वेडिंगची फिल्म करावी लागते. तिचा हा प्रवास नकारात्मकतेने सुरू होतो. हे काय आहे? याला काय अर्थ आहे?, असा तिचा प्री-वेडिंग फिल्मकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. परंतु नकारात्मतेने सुरू झालेला तिचा प्रवास शेवटाकडे येताना सकारात्मक होत जातो. माझ्या व्यक्तिरेखेबरोबरच इतर व्यक्तिरेखांचा चित्रपटातील प्रवासही रंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे.

लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्वभाववैशिष्टय़ांच्या व्यक्तिरेखा एकत्र आल्यामुळे होणारी धमाल इथे पाहायला मिळेल.

संगीतकार, गायक म्हणून परिचित असलेला सलील कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात उतरला आहे. त्याच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाविषयी मुक्ताने सांगितलं, सलीलने मला कथा ज्या आत्मविश्वासाने ऐकवली, तेव्हाच ती कथा मला आवडली होती. त्याने कथेवर घेतलेली मेहनत मला दिसली. कथा सांगण्यातूनच चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला होता. लिहिलेली आणि चित्रित कथा यात खूप फरक असून तो तांत्रिक आणि अनुभवाचा भाग असतो. पण सलीलची दिग्दर्शक म्हणून या माध्यमावरही पकड आहे. त्याने याआधी काही म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन केल्यामुळे तो अनुभव त्याच्या गाठीशी होता. चित्रपटाचं छायालेखक, निर्मिती चमू या सगळ्यांनी खूप छान काम केलं. तसंच या चित्रपटात प्रसिद्ध कलाकार एकमेकांबरोबर पहिल्यांदाच काम करत होते. हाही योग सुंदर जुळून आला. ‘जोगवा’पासून ते ‘वेडिंगचा शिनेमा’पर्यंत साकारलेल्या भूमिकांविषयी मुक्ता म्हणाली, मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी या पिढीची अभिनेत्री आहे. मला याचा अभिमानही वाटतो. ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटात दोन व्यक्तिरेखांकरवी गोष्ट सांगण्यात आली होती. या प्रेमकथेची मांडणी वेगळी होती. मी केलेल्या प्रत्येक चित्रपटातून नेहमी काही तरी चांगलं करण्याची संधी मला मिळाली. आजवर विविधांगी भूमिका यशस्वीपणे साकारल्या. मात्र ऐतिहासिक किंवा चरित्रात्मक भूमिका अद्याप साकारलेली नाही. अशा प्रकारच्या भूमिका करायला मला नक्कीच आवडेल. सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारायला मिळाली तर करायची इच्छा आहे. शाळेत असल्यापासून सावित्रीबाईंचा जीवनपट मला खुणावतो आहे. तसंच त्या त्या काळाच्या पाश्र्वभूमीवर स्वकर्त्वृत्वाने तळपलेल्या अशा अनेक व्यक्तिरेखा साकारायला मला आवडेल.

मराठी चित्रपटामध्ये पैसा गुंतवण्यासाठी निर्माते आता उत्सुक असतात. विशेष करून अमराठी निर्मातेही मोठय़ा प्रमाणात मराठी चित्रपटांमध्ये पैसा गुंतवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी आता व्यवसाय झाला आहे. त्यामुळे चित्रपटाची जाहिरात, तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही प्रयत्न होताना दिसतात. चांगला चित्रपट बनणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं या दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचा मेळ आता कुठे तरी साधला जातो आहे. कारण चित्रपटाला चांगले प्रेक्षकही मिळताहेत. आता चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहा, असं आवाहनही त्यांना करावं लागत नाही. कारण विषय आवडला तर ते चित्रपटगृहातच जाऊन चित्रपट पाहतातच. आणि असे उत्तम निर्मिती मूल्य असलेले चित्रपटही तयार होत आहेत. चित्रपट काही दिवसांनी दूरचित्रवाणीवर पाहायला मिळेलच, हा दृष्टिकोन मागे पडून चित्रपटाच्या मांडणीसाठी, तांत्रिक गोष्टींसाठी, त्यातील दृश्यात्मकतेसाठी असे चित्रपट चित्रपटगृहातच जाऊनच पाहावे, असा विचार प्रेक्षक करायला लागले आहेत. त्यामुळे मराठीत आता चित्रपटनिर्मितीबरोबरच त्याची प्रसिद्धी करण्यासाठी वेगळं बजेट ठेवलं जातंय आणि हे खूप गरजेचं असल्याचं मुक्ताने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

मराठीतील दिग्दर्शकांविषयी ती म्हणाली, मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन करणारी दिग्दर्शकांची पिढी पूर्णपणे याच माध्यमाचा विचार करून या क्षेत्रात आता दाखल झाली आहे. कारण १० वर्षांपूर्वी असा पायंडा होता की, नाटक केलेले दिग्दर्शक पुढे जाऊ न चित्रपट करतात. पण ते प्रमाण आता कमी झालंय. आता फक्त चित्रपट करू इच्छिणारे दिग्दर्शक चित्रपट व्यवसायात येत आहेत. त्यामुळे मांडणीमधलं वैविध्य दिसू लागलंय. पण यात चांगले-वाईट असा भेदभाव करणं योग्य नाही. विविध दिग्दर्शकांबरोबर काम करतानाच्या अनुभवाविषयी तिने सांगितलं, चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून सतीश राजवाडे हा अपवाद वगळता मी इतर दिग्दर्शकांबरोबर एकेकच चित्रपट केला आहे. समीर विद्वांसबरोबरही तसं काम केलं, पण ‘वाय झेड’मध्ये माझी छोटी भूमिका होती. जे कुणी माझ्याकडे नवे विषय घेऊ न येतील, त्यांच्याबरोबर मी काम करेन, असा विचार मी नेहमीच करते. त्यामुळे बऱ्याच वेळा असं झालं की, ज्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे, अशाही दिग्दर्शकांबरोबर काम केलं. पण त्यांच्याबरोबर काम करतानाही छान वाटलं. प्रत्येक दिग्दर्शकाच्या चित्रपटाकडे पाहण्याच्या पद्धतीमुळेही मांडणीमध्ये विविधता येते. तो अनुभव मला घेता आला.

विविध विषयांवरचे, प्रकारचे चित्रपट असले तरी प्रत्येक चित्रपटातून निखळ मनोरंजन झालंच पाहिजे. त्यासाठी त्या चित्रपटाचं पटकथालेखन, दिग्दर्शनही उत्तम हवं. कारण गोष्ट सांगण्यासाठी आपण चित्रपट या माध्यमाचा कसा प्रभावी वापर करतो हे आणि गोष्ट कोण सांगतंय, हेही महत्त्वाचं आहे. लवकरच माझी एक वेबसीरिज येणार असून त्यासाठी वेळ काढला असल्याची माहितीही मुक्ताने दिली.

मराठीत खूप वेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार होतात. अर्थात मराठीत सुरुवातीपासूनच वेगळ्या विषयावरील उत्तम चित्रपट तयार झाले आहेत. कृष्णधवल चित्रपट काळातील ‘माणूस’, ‘कुंकू’ हे चित्रपट याचे ठळक उदाहरण आहे. मराठी चित्रपटातून विषयाचंही किती वैविध्य आहे तेही पाहायला मिळालं आहे. चांगला आशय आपल्याकडे नेहमीच होता. आता त्याच्याबरोबरीने चांगली निर्मितीमूल्यं असणाऱ्या निर्मितीसंस्था मराठीत येत असून त्याचा फायदा मराठी चित्रपटांना होत आहे.  – मुक्ता बर्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2019 11:28 pm

Web Title: what is acting
Next Stories
1 गोष्टरंगी रंगू या..
2 मनोरंजन उद्योगाचे चलनी यंत्र!
3 घरवापसीचा श्वानखेळ
Just Now!
X