बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली होती. तो त्याच्या स्टाइलसाठी ओळखला जायचा. सुशांतच्या निधनाने केवळ चित्रपटसृष्टीलाच नाही तर चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. नुकताच सुशांतचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सुशांत टीव्हीवर चित्रपट पाहताना दिसतोय. टीव्हीवर त्याचा ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सुरु असल्याचे दिसत आहे. चित्रपटात क्रिकेटच्या मैदानातील सीन सुरु आहे. सुशांत तो पाहत असताना महेंद्रसिंह धोनीचाला चियर करताना दिसत आहे. तसेच चित्रपट पाहाताना त्याच्या हातात पुस्तक असल्याचे दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर सुशांतचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तसेच हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे. त्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात अनुपम खेर यांनी धोनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर भूमिका चावलाने त्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच चित्रपटात कियारी अडवाणी आणि दिशा पटाणी यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन निरज पांडे यांनी केले होते.
सुशांतने १४ जून रोजी वांद्र येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. गेल्या काही दिवसांपासून सुशांत नैराश्यामध्ये होता आणि म्हणूनच त्याने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.