गेल्या वर्षभरापासून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी ‘ हा कंगनाचा आगामी चित्रपट या ना त्या कारणानं वादात सापडला आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांवर क्रू मेंबरचे पैसे थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर कंगनानं क्रू मेंबरच्या पाठीशी उभी राहण्याचं ठरवलं आहे. त्यांचे आरोप खरे असतील तर जोपर्यंत सगळ्या क्रू मेंबरला त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळत नाही तोपर्यंत मी मणिकर्णिकाचं प्रमोशन करणार नाही अशी भूमिका तिनं घेतली आहे.

‘चित्रपटासाठी काम करणाऱ्या लहानातल्या लहान व्यक्तींचे पैसे थकवणं देखील चुकीचं आहे. हा अन्याय आहे. जर असं घडलं असेल तर मी स्वत: क्रू मेंबरच्या पाठीशी उभी राहिल. या चित्रपटासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीचे पैसे जरी थकले असतील तरही मी चित्रपटाचं प्रमोशन करणार नाही’ असं म्हणत तिनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना तिनं आपली भूमिका मांडली. ‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांनी जवळपास १.५ कोटी रुपये थकविल्याचा आरोप क्रू मेंबर्सनी केला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून चित्रपटासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पैसे अद्यापही दिले नसून ज्यूनिअर कलाकारांचेही २५ लाख रूपये देणे बाकी असल्याचे, वेस्टर्न इंडियाच्या सिने कर्माचाऱ्यांच्या संघाने म्हटलं आहे. ऑक्टोबरपर्यंत पैसे मिळणं अपेक्षित होते. चित्रपट निर्माते कमल जैन यांना याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. याबाबत आता मजूर समितीशी संपर्क साधण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रकरणावर कंगानानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या छोट्या लोकांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. या गोष्टी अन्यायकारक आहेत. जर या प्रकरणात लवकर तोडगा निघाला नाही तर चित्रपटाचं प्रमोशन करणार नाही असा इशारादेखील मी निमार्त्यांना दिला असल्याचं कंगनानं यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी ‘ या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनांची धुरा कंगना सांभाळत आहे. ‘मणिकर्णिका’च्या निमित्तानं पहिल्यांदाच कंगना दिग्दर्शनाकडे वळली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत ती जातीनं लक्ष घालत आहे.