ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज पहाटे चार वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६३ वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेली ४० वर्षे मराठी प्रेक्षकांच्या आणि चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराच्या या एक्झिटमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. विजू दादा गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अनेक स्तरांमधून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेदेखील ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

सिद्धार्थने वाहिलेल्या श्रद्धांजलीमधून तो नि:शब्द झाल्याचं पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ विजूदादांचा फोटो शेअर करत त्यावर अनेक दु:ख व्यक्त करणाऱ्या इमोजी कॅप्शन म्हणून दिल्या आहेत. सिद्धार्थच्या या पोस्टमुळे चित्रपटसृष्टीने जणू त्यांचा ध्रुवतारा गमावल्याची जाणीव होताना दिसत आहे.

दरम्यान, त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.