scorecardresearch

“पत्नी रिना, किरण राव आणि मुलांकडे दुर्लक्ष करणे ही माझी मोठी…”, आमिर खानचा धक्कादायक खुलासा

नुकतंच त्याने ‘न्यूज १८ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांसह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नुकतंच आमिरने त्याचे वैयक्तिक आयुष्य, विवाह आणि मुलं याबद्दल वक्तव्य केले आहे. नुकतंच त्याने ‘न्यूज १८ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.

आमिर खानने १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आमिर खानने न्यूज १८ इंडियाला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, “सहसा लोक त्यांच्या करिअरकडे लक्ष देण्यासाठी तीन ते चार वर्षे देतात. कधीकधी काही लोक पाच वर्षे करिअरवर लक्ष केंद्रीत करतात. पण मी मात्र नेहमीच माझ्या कुटुंबापेक्षा करिअरला जास्त वेळ दिला आहे. सतत करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे.”

यापुढे आमिर खान म्हणाला, “कुठेतरी मी माझी जबाबदारी पार पाडली नाही. पण आता मात्र मी माझे आई-वडील, भावंडे, पहिली पत्नी रिना, किरण, रिनाचे आई-वडील, किरणचे आई-वडील आणि माझी मुलं यांच्यासोबत नवीन सुरुवात करत आहे. ही ती लोक आहेत जी माझ्या अगदी जवळची आहेत. मी १८ वर्षांचा असताना सिनेसृष्टीत आलो. मला खूप काही शिकायचं होतं, खूप काही करायचं होतं. त्यामुळे मी माझ्या कामात पूर्णपणे हरवून गेलो, पण आज मला जाणवलं आहे की जी माझ्या जवळची, माझ्यासाठी महत्त्वाची असलेली माणसे ही फार गरजेची होती. त्यांना मी वेळ दिलेला नाही.”

“मी प्रेक्षकांसोबत हसलो आणि त्यांच्यासोबत रडलो. इतकंच नाही तर प्रेक्षकांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. मी माझा सगळा वेळ माझ्या कामासाठी दिला. मला त्यावेळी असे वाटले की माझे कुटुंब माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांची मने जिंकण्याच्या कामात पूर्णपणे हरवून गेलो होतो,” असेही आमिरने सांगितले.

“श्रेया बुगडे आम्हाला अशी उघड्यावर पाडेल असं वाटलं नव्हतं…”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

दरम्यान आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा आगामी चित्रपट येत्या ऑगस्ट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसणार आहेत. त्या दोघांनी या आधी ‘३ इडियट्स’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंग आणि मानव व्हीजे या चित्रपटात दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan confesses he took reena kiran rao kids for granted its my biggest mistake nrp